… तर मला वेगळा विचार करावा लागेल, नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी सांगितलं

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून भाजप नेते एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा असताना आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. गेली 40 ते 42 वर्षे पक्षासाठी काम करत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर अन्याय होत आहे. मला टार्गेट केले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. शेवटी मी माणूस आहे, देव नाही, मलाही भावना आहेत. जर माझ्यावर असाच अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा खडसेंनी भाजपला दिला आहे.

भाजपच्या नेत्यांनीच पंकजा मुंडे आणि रोहीणी खडसे यांचा पराभव केला असेल तर पुरावे द्या असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानंतर खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावे देण्याची तयारी दर्शवली. मला पुरावे दाखवण्याची परवानगी पक्षश्रेष्ठींनी द्यावी. मी चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. पाटील म्हणाले हा पक्षांतर्गत विषय आहे. अमित शहा, नड्डा, भुपेंद्र यादव यांच्याशी चर्चा करून पुरावे दाखवणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले असल्याचे खडसे यांनी सांगितले. पक्षातील ज्या लोकांनी पक्षविरोधी काम केले आहे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. प्रदेशाध्यक्षांना मी कागदोपत्री पुरावे दिले असून ते समाधानी आहेत. पक्षा विरुद्ध काम करणाऱ्यांवर पक्ष कारवाई करील अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

ओबीसी नेतृत्वाला मागे खेचण्याचा प्रयत्न सुरू होत असून नाराज नेते आपोआपच एकत्र येतात, असे खडसे म्हणाले होते. यावर बोलताना खडसे म्हणाले, बहुनज समाज आणि ओबीसी समाजावर अन्याय होत आहे अशी कर्यकर्त्यांची भावना आहे. त्यांच्या भावना पक्षापर्यंत पोहचवण्याचे काम मी केले आहे. भाजपचा चेहरा बदलवण्याचे काम अनेक नेत्यांनी केले आहे. पक्ष वाढवण्यात ओबीसी समाजाचा मोठा वाटा असल्याचे खडसे यांनी सांगितले.

Visit : Policenama.com