Prakash Ambedkar : ‘सरकारला एक आठवड्याची मुदत, आम्हाला 150 रुपयांत लस द्या अन्यथा… ‘

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस ज्या देशांनी आपल्या येथून घेतली. त्या सर्वांना 3 ते 5 डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र, आपल्याच देशात आणि पुण्यात तयार होणारी ही लस आपल्या सर्वांना 8 डॉलर दराने खरेदी करावी लागत आहे. यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे ? हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही एक आठवड्याची मुदत देत आहोत. आम्हाला ही लस 150 रुपयात मिळावी. अन्यथा आम्ही आठवड्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विरोधात आंदोलन करु असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

जगातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी कंपनी सीरम इन्स्टिट्युटने आपल्या कोरोना लसीची किंमत जाहीर केली आहे. सीरम कंपनीने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी वेगवेगळी किंमत निश्चित केली आहे. यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. सीरमने लसची किंमत केंद्र सरकारला 150, राज्य सरकार 400 आणि खासगी रुग्णालयांना 600 रुपये निश्चित केली आहे.

दरम्यान, कोव्हिशील्ड लशीची आधीची किंमत ‘अ‍ॅडव्हान्स्ड फंडिंग’वर आधारित होती व आता आपल्याला लसीचे उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची आहे, असे सांगून या लशीच्या किंमती आधीच्या किमतीपेक्षा दीडपट ठेवण्याचे देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने समर्थन केले आहे.

देशात कोरोना संसर्ग वाढत असून वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशातील 18 वर्षावरील सर्वांनी लस देण्याचे जाहिर केले आहे. लसीकरण मोहीमेची व्यप्ती वाढवण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी सरकारने खुल्या बाजारासह राज्यांना लसविक्री करण्यास निर्मात्यांना मुभा दिली. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड लशीची किंमत जाहीर केली.