मतदान न केल्यास बँकेतून ३५० रुपये होणार कट…

हा व्हायरल मॅसेज तुम्हाला मिळाला का?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीला मतदान न केल्यास मतदारांच्या बँक खात्यातून ३५० रुपये कट केले जाणार आहेत. या संदर्भातील निर्देश निवडणूक आयोगाने देशातील सर्व बँकांना दिले आहेत. तसेच या निर्णयासंदर्भात नवी दिल्ली या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने हा निर्णय देशातील मतदारांना सांगितला आहे.

लोकसभा निवडणुकीला तुम्ही मतदान न केल्यास निवडणूक आयोगाकडून तुमच्या बँक खात्यातील ३५० रुपये कट केले जाणार आहेत. या संदर्भातील निर्देश देशातील सर्व बँकांना निवडणूक आयोगाने दिले असून ज्या लोकांचे बँकेत खाते नाही त्यांना देखील मतदान न केल्यास ३५० रुपयांची झळ बसणार आहे. ज्या लोकांचे बँकेत खाते नाही अशा लोकांच्या मोबाईल रिचार्ज मधून हे पैसे निवडणूक अयोग वसूल करणार आहे.

अशा आशयाचे मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. त्या मॅसेजच्या खाली ‘बुरा ना मनो होली है’ असे लिहून संदेश व्हायरल करण्यात येत आहेत. मात्र, या संदेशात काहीच तथ्य नसून हे पूर्णतः खोटे असल्याचे समोर आले आहे. अशा निर्णयासंदर्भात निवडणूक आयोगाकडून कसलीही पत्रकार परिषद घेण्यात आली नव्हती. मतदान न केल्यास कसलेही पैसे बँक खात्यावरून अथवा मोबाईल रिचार्जमधून कट केले जाणार नाहीत, त्यामुळे आपण निश्चिन्त राहावे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीला मतदान करावे. कारण ते आपले कर्तव्य आणि मूलभूत अधिकार आहे. मात्र, तरीही काही लोक मतदान करत नसतील तर त्यांच्या खात्यावरून ३५० रुपये कट करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाच पाहिजे. कारण त्याशिवाय देशात मतदानाचा टक्का वाढणार नाही.