वर्णव्देष ! ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलास तर गोळी घालू’, जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीयाच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा चर्चेत आहे. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ख्रिस गेल, डॅरेन सॅमी यांनीही या प्रकरणावर परखड मत मांडले आहे .केवळ फुटबॉलच नाही, तर क्रिकेटमध्येही खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो, असे विधान ख्रिस गेलने केले होते. आयपीएल संघातील काही खेळाडू मला ‘काळू’ म्हणायचे, असं डॅरेन सॅमीने सांगितले होते. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी खेळाडू फिल डीफ्रिटस याने त्याच्यासोबत घडलेला वर्णद्वेषाचा भयंकर अनुभव सांगितला.

मी जेव्हा स्थानिक क्रिकेट खेळायचो, तेव्हा आमच्या संघात अनेक गौरवर्णीय खेळाडू होते. मला नेहमी त्यांच्याइतकंच महत्त्व मिळावे असे वाटत होते. त्या संघाने मला कधीच आपलेसे केले नाही. प्रत्येक सामना खेळताना हा माझा शेवटचा सामना असू शकतो अशी भीती मला वाटत असायची, पण इंग्लंडच्या संघात खेळण्याची ओढ मला चांगली कामगिरी करण्यास भाग पाडायची. मला धमकीची पत्रदेखील आली. एकदा नव्हे, तर दोन-तीन वेळा मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ‘तू जर इंग्लंडच्या संघातून खेळलास, तर तुला गोळी घालू’, अशी धमकी लिहिलेली पत्र माझ्या घरात येऊन पडायची, असे डीफ्रिटस म्हणाले. त्यावेळी मला पाठिंबा देणारे कोणीच नव्हते. मी घरी जाऊन आईला सांगायचो की मला इथले कोणीच आपलेसे करत नाहीत, मी इथला आहे असे वाटतंच नाही. पण आता जेव्हा मी माझ्या कारकिर्दीकडे पाहतो, तेव्हा मी जे कमावलं त्याचा मला अभिमान वाटतो, असेही त्याने सांगितले.