तुम्हाला उन्हाचा त्रास टाळायचाय ? मग करा ‘हे’ घरगुती उपचार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यात अनेक ठिकाणी तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. या वाढलेल्या तापमानाचा शरीरावर मोठा परिणाम होत असतो. वाढत्या तापमान बदलाशी जुळवून घेण्यास शरीराला वेळ लागातो. लहान मुले, तरुण मुले, तरुण, वयस्कर लोक, स्त्री, पुरुषांमध्ये तापमानाचे वेगळे परिणाम दिसून येतात. तापमान बदलामुळे थकवा येणे, डोकेदुखी, चक्कर, डिहायडड्ढेशन, घामोळे येणे, उष्माघात, मूतखडा, उन्हाळा लागणे, लघवीला जळजळ होणे, ॲसिडीटी, उलट्या, जुलाब होणे, भूक मंदावणे, ब्लडप्रेशर कमी जास्त होणे, नाकातून रक्तस्त्राव आदी त्रास होतो. हा त्रास अगदी घरगुती उपचारानेही टाळता येतो.

कडक उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. तसेच द्राक्षे, कलिंगड, टरबूज, काकडी, संत्री, मोसंबी, डाळिंब इत्यादी पाणीदार फळे खावीत सरबते, लिंबू, कोकम, आवळा, कैरीचे पन्हे, उसाचा रस, नारळपाणी यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. मूतखडा, लघवीचा त्रास तसेच थकवा, डोकेदुखी कमी होते. कधी कधी नाकातून रक्त येते. असे झाल्यास सुती कापडात बर्फ गुंडाळून तो नाकावर लावावा. डोक्‍यावर थंड पाणी शिंपडावे. कांदा नाकाजवळ धरावा. तसेच उष्माघाताचा त्रास होत असलेल्या व्यक्तिस सावलीत, मोकळ्या हवेत झोपवावे. हेड लो पोझिशनमध्ये पायाखाली उशी ठेवावी. कपडे सैलसर करून थंड पाण्याने पुसून घ्यावे. पाणी, खडीसाखर द्यावी. त्यानंतर तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जावे.

कडक उन्हाळ्यात भूक मंदावते. तसेच ॲसिडीटी, उलट्या, मळमळ असा त्रास होऊ शकतो. यासाठी पचायला हलका, साधा सकस आहार घ्यावा. कांदा तापमान कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याने कांदा जेवणाबरोबर खावा. तेलकट, तळलेले, मसालेदार, मैद्याचे पदार्थ, नॉनव्हेज, हॉटेलचे पदार्थ या दिवसात खावू नये. आईस्क्रीम, कोल्डक्रिम, कोल्डड्रिंक्‍स, चहा, कॉफी, अल्कोहोलही टाळले पाहिजे. उन्हाळ्यात होणारा आणखी एक त्रास म्हणजे घामोळे होय. घर्मग्रंथीची छिद्रे बंद झाल्यास घामोळे येतात. यासाठी उन्हाळ्यात सैलसर, फिकट, सुती, पातळ कपडे घालावेत. थंड पाण्याने दिवसातून किमान दोन वेळा अंघोळ करावी. दुपारी शक्यतो घराबाहेर पडू नये. कामानिमित्त बाहेर जायचे असल्यास सनकोट, कॅप, छत्री, गॉगलचा वापर करावा. शिवाय सोबत पाणी बॉटल, खडीसाखर ठेवावी. बाहेरून घरात आल्यावर थंड पाण्याने हात, पाय, डोळे, तोंड धुवावे.