गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाकडे सरकारचे दुर्लक्ष 

औरंगाबाद; पोलीसनामा ऑनलाईन- तत्कालिन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी 2015 मध्ये स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी शासकीय दुध डेअरीच्या जागेची निवडही करण्यात आली. सरकार दरबारी या स्मारकाचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. राज्यात भाजपचे सरकार असतांना गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला निधी मिळू नये या सारखे दुसरे दुर्दैव नसल्याचे मुंडे समर्थकांकडून बोलले जात आहे.
बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक शहरात असावे यासाठी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुढाकार घेत शी घोषणा केली होती. औरंगाबादेतील शासकीय दुध डेअरीची दोन एकर जागा यासाठी निवडण्यात येऊन सल्लागार मंडळाची स्थापना देखील करण्यात आली.
मे 2015 मध्ये खडसे यांनी त्यांच्या दालनात नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, बालविकास मंत्री पंकजा मुंडे, तत्कालीन विभागीय आयुक्‍त उमाकांत दांगट व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. त्यानंतर 2016 मध्ये या स्मारकासाठी दिल्लीच्या एका अधिकाऱ्यास प्रस्ताव तयार करण्याचे काम देण्यात आले होते. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला.
काय म्हणाले होते एकनाथ खडसे 
सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. खडसे बोलले होते . ‘मराठवाड्याच्या विकासासाठी कायम अग्रणी भूमिका घेणारे मराठवाड्याचे सुपूत्र गोपीनाथ मुंडे यांची सामान्य माणसाबद्दलची निष्ठा आणि विकास कामाबद्दलचा आग्रह या भूमिकेतून त्यांनी केलेली राजकीय वाटचाल ही प्रेरक आहे. त्यांच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण प्रसंगांची माहिती करून देणारे दृकश्राव्य चित्रण, त्यांची निवडक भाषणे, त्यांच्या जीवनाबद्दल माहिती देणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय त्यासोबत ग्रंथालय आणि सुंदर बाग अशा सुविधांनी युक्त उत्कृष्ट असे स्मारक येत्या वर्षभरात उभे करण्याचा शासनाचा विचार आहे,’ असे खडसे म्हणाले होते
दरम्यान, महसुल मंत्री एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पायउतार व्हावे लागले आणि गोपीनाथ मुंडे यांचे स्मारकही रखडले. प्रस्तावाला मंजुरी आणि निधी दोन्ही नसल्याने भाजप सरकारकडूनच गोपीनाथ मुंडेची थट्टा केली जात असल्याची भावना समर्थकांमध्ये आहे.
दरवर्षी गोपीनाथ मुंडेच्या पुण्यतिथीला स्माराकासाठी आरक्षित असलेल्या जागेवर भाजपचे नेते, पदाधिकारी अभिवादनासाठी जातात. पण त्यांच्या स्मारकासाठी मात्र कुणीच पुढाकार घेत नसल्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे
गोपीनाथ मुंडे यांच्या  ठरवलेल्या स्मारकाच्या दोन एकर जागेत उद्यान, स्मारक, त्यांच्या ग्रंथ, छायाचित्रांचे संग्रहालय, शंभर आसन क्षमतेचे एम्पी थिएटर उभारण्यात येणार आहे. हे स्मारक सध्या कागदावर असून ते प्रत्यक्षात कधी येणार यांची वाट गोपीनाथ मुंडेंचे समर्थक पाहत आहेत.