IMF Report : यंदा बांग्लादेशातील नागरिकांपेक्षाही कमी होणार भारतीयांची कमाई !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)नं वर्तवलेल्या अंदाजानुसार या आर्थिक वर्षात भारताच्या दरडोई जीडीपीत 10.3 टक्क्यांनी घट होईल. आयएमएफचा हा अंदाज सत्य सिद्ध झाल्यास दरडोई जीडीपीत भारत बांग्लादेशापेक्षाही खाली जाईल. मंगळवारी आयएमएफचा जारी झालेला अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक नुसार, 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या या आर्थिक वर्षात भारताच्या दरडोई जीडीपीत 10.3 टक्क्यांनी घट होऊन तो 1877 डॉलरवर येईल.

आयएमएफ अहवालानुसार, बांग्लादेशाचा दरडोई जीडीपी 2020 मध्ये 4 टक्क्यांनी वाढून 1888 डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. यापूर्वी जून महिन्यात आयएमएफनं यात 4.5 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज वर्तवला होता.

असं असलं तरी पुढील आर्थिक वर्षात आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा आर्थिक विकासदर 8.8 टक्क्यांपर्यत पोहोचण्याचा अंदाज आहे. असं झालं तर भारत पुन्हा एकदा सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल. या दरम्यान चीनचा विकासदर 8.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत 4.4 टक्क्यांची घसरण
आयएमएफच्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यस्थेत 4.4 टक्क्यांची घट होऊ शकते. वर्ष 2021 मध्ये यात 5.2 टक्क्यांचीही मोठी वृद्धी होऊ शकते. आयएमएफच्या अहवालात म्हणण्यात आलंय की, 2020 दरम्यान जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये केवळ चीनच्याच जीडीपीत 1.9 टक्क्यांची वाढ नोंदवली जाईल.