‘कोरोना’मुळे यंदा पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनला परवानगी देता येणार नाही : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सध्या कोरोना काळात गणेशोत्सव साजरा होणार आहे. मात्र, याच काळात पुण्यात कोरोना विषाणूचे संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जनला परवानगी नाहीण, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

अजित पवार यांनी सांगितले की, पुणे आणि परिसरात कोरोना विषाणूचा धोका कायम आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी दिली जाऊ शकत नाही. अशी परवानगी दिल्यास पुण्यात सुमारे 55 लाख लोक बाहेर पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे अशी परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे त्यांनी आज आढावा बैठकीमध्ये सांगितले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ’कोरोना’ग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. यातच कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यूदर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढविणे, तसेच रुग्णांवर वेळीच उपचार करणे, हे महत्वाचे असल्याचे सांगितले आहे.

तसेच इतर आजार असणार्‍या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, अशा सूचनाही अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिल्या. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा (रक्तद्रव) थेरपी उपयुक्त ठरेल, असा विश्वास देखील पवार यांनी व्यक्त केला आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ’कोरोना’च्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी पवार बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये ’कोरोना’ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतंय, ही समाधानकारक बाब आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह उपाययोजनाबरोबरच कोरोनाग्रस्त रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील, याबाबत दक्षता घेतली पाहिजे. तसेच कोरोना विषाणूची भिती घालविण्यासाठी आणि याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी छोट्या-छोट्या व्हीडिओच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या आहेत.