संसार सुरु होण्याआधीच मोडला ; नवदांपत्याच्या अपघातात पतीचा मृत्यू

लाखांदूर (भंडारा) : पोलीसनामा ऑनलाइन – दीड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवदांपत्याचा संसार सुरु होण्याआधीच मोडला. लग्नानंतर दुचाकीवरून सासुरवाडीला जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. अवघा दीड महिन्याचा संसार काही क्षणात मोडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात चिमुरजवळ रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.

लोकेश गोदाराम दिघोरे (वय-२८ रा. परसोडी नाग) असे मृताचे नाव आहे तर अपेक्षा लोकेश दिघोरे (वय-२२) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. लोकेश आणि अपेक्षाचा विवाह ११ मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मंगलगाव येथे झाला होता. लग्न झाल्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणण्यासाठी रविवारी दोघेजण सासुरवाडी मंगलगाव येथे जात होते. चिमुरजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये दुचाकीने पेट घेतला. दुचाकी पेटल्यामुळे अपेक्षा ५० टक्के भाजली. तर लोकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी दोघांना उपचारासाठी नागपूर येथे हलवले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने लोकेशचा वाटेतच उमरेडजवळ मृत्यू झाला. अपेक्षाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच परसोडे गावात शोककळा पसरली आहे.
आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग