फसवणूक प्रकरणी साधना वर्तक यांचा अटकपुर्व जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जमीन विक्री व्यवहारात महिलेची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात साथना वर्तक यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांचा अटकपुर्व जामीन मंगळवारी मंजूर करण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए. एन. सिरसीकर यांनी हा आदेश दिला.

आदिती माधव दीक्षीत (वय ५२,रा. लक्ष्मी निवास, प्रभात रस्ता, डेक्कन) यांनी यासंदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक मानकर, साधना वर्तक, मुकुंद परशुराम दीक्षीत (दोघे रा. कोथरूड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आदिती यांच्या हिश्शाची जमीन पिंपरी वाघिरे येथे आहे. या जमीनीची बनावट कागदपत्रे तयार करून मानकर, वर्तक, दीक्षीत यांनी या जमिनीची परस्पर विक्री केली. जमीन विक्रीतून कोट्यावधी रूपये मिळाले. तसेच मानकर, वर्तक, दीक्षीत यांनी माझी फसवणूक केली. जमीन विक्री व्यवहारातून मिळालेल्या पैशांबाबत दिशाभूल करत कुलमुख्यारपत्राचा मानकर, वर्तक यांनी गैरवापर केला, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कोथरुड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर साधना वर्तक यांनी याप्रकरणी न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांनां अंतरिम जामीन मंजूर केला होता. तर मंगळवारी त्यांना अटकपुर्व जामीन मंजूर करण्यात आला. अ‍ॅड. चिन्मय भोसले यांनी साधना वर्तक यांच्या वतीने बाजू मांडली. अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए. एन. सिरसीकर यांनी जामीन मंजूर केला.