आयकर विभागाची आता बॉलिवूडवर नजर; अनुराग कश्यपसह तापसी पन्नूच्या घरावर छापा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाने (IT) चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर छापेमारीची कारवाई केली आहे. ही छापेमारी फँटम फिल्मशी संबंधित आहे. आयकर विभागाकडून केली जाणारी ही कारवाई मुंबईतील विविध ठिकाणांवर होत आहे. याबाबतची माहिती सध्या दिली जात आहे.

विकास बहल, अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरोधात कथितरित्या मोठ्या प्रमाणात आयकरची चोरीचे प्रकरण आहे. या सर्वांच्या मुंबई आणि तेथील बाहेरच्या ठिकाणांवर छापेमारीची कारवाई केली जात आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT)च्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले, की फँटम फिल्मच्या ठिकाणांवर छापेमारीची कारवाई केली गेली आहे. टॅक्स चोरीच्या मुद्यावरून मुंबई आणि पुण्यातील 22 ठिकाणांवर आयकर विभागाकडून छापेमारीची कारवाई केली जात आहे.

दरम्यान, आयकर विभागाची नजर आता बॉलिवूडच्या सेलिब्रिटींवर असणार असल्याची माहिती दिली आहेत. छापेमारीच्या क्रमात आणखी काही मोठी नावे समोर येऊ शकतील असे सांगितले जात आहे.