राज्य राखीव दलामुळे राज्य पोलीस दलाच्या लौकीकात वाढ : पोलीस महासंचालक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- राज्य राखीव पोलीस दल हे अत्यंत शिस्तीचे आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे दल आहे. राज्य राखीव दलाच्या पाईप बॅंड पथकाने सलग ३ वर्षे सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देऊन महाराष्ट्र पोलीस दलाच्या लौकीकात मोठी भर घातली आहे. राज्य राखीव दल ही सुरक्षेची अभेद्य भींत आहे. असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी केले.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र, १ रामटेकडी येथे राज्य राखीव पोलीस दलाचा ७१ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी राज्य राखीव पोलीस बलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक संजीव कुमार सिंघल, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना राज्य राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक अशोक मोराळे, माजी महापौर प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

राज्य राखीव पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच वर्धापन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्या स्पर्धांचे बक्षिस वितरणही करण्यात आले. तसेच महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रात्यक्षिक व माहिती देण्यात आली.

सहायक समादेशक सुभाष सोनवणे व दिलीप खेरेकर यांनी हर्ष कवायतींचे प्रमुख म्हणून संचलन केले. पोलीस निरीक्षक महादेव गवारी, सतीश क्षीरसागर, ईश्वर चौधरी, खोसेकर, बाळासाहेब लोहार, रमेश वेठेकर, राजेंद्र राऊत यांनी संचलनात दस्त्यांचे नेतृत्व केले. पुण्याला तब्बल १६ वर्षांनी हा मान मिळाला आहे.

तर वर्धापन दिनानिमित्त राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने पुणे ते नागपूर सद्भावना सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत १८० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी १०१७ किलोमीटर अंतर पार करून सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक, तसेच बेटी बचाओ, पाण्याचे महत्व, ग्लोबल वार्मिंग, पोलीस दलाचे कामकाज, राज्य राखीव दलाची भुमीका इ. विषयांवर जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचन अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन समितीमध्ये पोलीस अधिक्षक डॉ. बी. जी. शेखर, पोलीस अधिक्षक अशोक मोराळे, समादेशक अरविंद चावरिया, रामकुमार, श्रीकांत पाठक, तानाजी चिखले, रामचंद्र केंडे, मर्गज, पौर्णिमा गायकवाड यांनी धुरा सांभाळली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय निकम, सिताराम नरके यांनी केले.