राष्ट्रवादी इंदापूर तालुकाध्यक्ष पद बदलाला पुन्हा वेग

बाभुळगाव : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – विधानसभेचे वारे संपते न संपते तोपर्यंत इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इंदापूर तालुकाध्यक्षपद बदलाच्या घडामोडींना वेग आला असुन, तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे बाभुळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापुर तालुका प्रसिद्धी प्रमुख वसंतराव आरडे यांनी तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याबाबतचा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असल्याची चर्चा रंगात येऊ लागली आहे.

विद्यमान तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील यांची मागील काही महिण्यांपूर्वी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून दुसर्‍यांदा त्यांची वर्णी लागली होती. महारूद्र पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू म्हणून ओळखले जातात. महारूद्र पाटील हे तालुकाध्यक्ष असतानाच्या काळात दत्तात्रय भरणे दोन वेळा विधानसभेवर निवडून आले असल्याने पाटील यांना दुसर्‍यांदा तालुकाध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. परंतु सध्या राष्ट्रवादीकडून तालुकाध्यक्षपदासाठीची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

वसंतराव आरडे हे वयाच्या १८ व्या वर्षापासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनिष्ठपणाने विविध पदावर कार्यरत असुन त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे. ते तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. तर सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांचे विश्वासु म्हणून ओळखले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदासाठी वसंतराव आरडे यांनी इच्छुक असल्याचा अर्ज पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांचेकडे अर्ज सादर केला आहे.

वसंतराव आरडे यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांचीही भेट घेतली असुन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षपद मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून संजय सपकळ, बाळासाहेब व्यवहारे, यांचेसह अनेकजण इच्छुक असुन कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. तर काही दिवसांनी तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणूका लागणार असल्याने तालुकाध्यक्ष पदाला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे. इंदापूर तालुक्यात ऐन उन्हाळ्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या माध्यमातुन राजकीय वातावरण चांगलेच तापणार असुन राष्ट्रवादीमधील तालुकाध्यक्ष पदावरूनही वातावरण चांगलेच गरम होण्याची चिन्हे दिसत असल्याने इंदापूर तालुक्यातील राजकीय समिकरणांची उत्सुकता वाढली आहे.

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा नविन समिकरणांची नांदी होताना तालुक्यातील जनतेला पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी नवीन कोणाची वर्णी लागणार की तालुकाध्यक्षपद महारूद्र पाटील यांचेकडेच राहणार याबाबतचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या हातात असुन तालुकाध्यक्षपदाच्या नविन निवडीबाबत तालुक्यात तर्क वितर्काला वेग आला आहे. तर जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर कोणता निर्णय घेणार याबाबत सर्वांचेच लक्ष लागून राहिले असून तालुक्यात लवकरन नविन राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.