स्वातंत्र्य दिन विशेष : ग्रामीण महिलांसाठी डायल 108 सेवा ठरतेय जीवनसंजीवनी ! दररोज तीनशेवर गर्भवती महिलाना लाभ, 3109 प्रसूती अम्ब्यूलन्समध्येच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय मदत सेवा राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी जीवनसंजीवनी ठरत आहे. आतापर्यंत तब्बल ११ लाख २७ हजार ५९६ गर्भवती महिलांनी प्रसूती किंवा तत्सम आरोग्य समस्यासाठी या सेवेचा लाभ घेतला आहे. जुलैअखेरच्या आकडेवारीनुसार रोज सरासरी ३५० पेक्षा अधिक महिला या सेवेचा लाभ घेत आहेत.

महाराष्ट्र शासनाचा निशुल्क उपक्रम असलेल्या आणि भारत विकास समूहाद्वारे (बीव्हीजी) संचालित केल्या जाणाऱ्या या सेवेत एकूण ९३७ रुग्णवाहिका तर मुंबई आणि दुर्गम भागात सेवेसाठी ३० बाईक ऍम्ब्युलन्स उपलब्ध आहेत. याद्वारे आपत्तीत सापडलेला नागरिकांना रुग्णवाहिकेद्वारे वेळेत प्राथमिक वैद्यकीय उपचार पुरवून रुग्णालयापर्यंत पोहचविले जाते. राज्यातील दुर्गम ग्रामीण भागातील महिलांना या सेवेचा लाभ होत आहे. एकूण लाभार्थी पैकी ७२% लाभार्थी हे ग्रामीण भागातील असून, महिला लाभार्थ्यांचे प्रमाण ५१.९१% एवढे आहे. ही सेवा सुरु झाल्यापासून राज्याचा मृत्युदर २० टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यात २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेचा लाभ कालच्या ३१ जुलैपर्यंत ५१ लाख २९ हजार २०३ जणांना झाला आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये एकूण ८२ रुग्णवाहिका तैनात आहेत. आतापर्यंत ३१०९ प्रसूती रुग्णवाहिकामध्येच झाल्या आहेत. सुमारे ५ लाख १४ हजार ३६६ नागरिकाना या सुविधेचा लाभ मिळाला आहे, असे या विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

कशी वापरायची ही सेवा !

अपघात, पडझड, हल्ला, हृदयविकाराचा झटका किंवा अन्य प्रकारच्या तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी लँडलाईन किंवा मोबाईलवरून फक्त १०८ हा क्रमांक डायल करायचा. त्यानंतर अगदी थोडक्यात घटना स्थान वगैरे विचारलेली आवश्यक माहिती द्यावी. त्यानंतर काही वेळात तुम्ही आहेत तेथे रुग्णवाहिका पोहोचेल. ही सेवा तुम्ही स्वतःसाठी किंवा वैद्यकीय मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींसाठी वापरू शकता.

ग्रामीण महिलांना ही सेवा वरदान ठरत आहे. कोरोना काळातही या सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अत्यंत चोख कामगिरी केली. काहींना कोरोनाची बाधा झाली. मात्र स्वतः:चा जीव धोक्यात घालून या सर्वानी जनसेवेचे व्रत स्वीकारले. याचा मला अभिमान वाटतो. या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि फक्त १०८ क्रमांक डायल करून अनेकांचे प्राण वाचवावेत असे मी आवाहन करतो.

– हणमंतराव गायकवाड (चेअरमन, बीव्हीजी)

राज्याच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या महाराष्ट्र मेडिकल एमर्जन्सी सर्व्हिसेस सेवेचे कार्यान्वयन खूप चांगल्या पद्धतीने करणाऱ्या बीव्हीजी समूहाच्या कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. या सेवेने रोहा रेल्वे अपघात, वारी, गणेश उत्सव आणि सध्याच्या कोरोना काळामध्ये चांगली कामगिरी केली आहे. बाईक अंबुलन्स ही सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले. स्वतंत्र्य दिनानिमित्ताने या सेवेत काम करणाऱ्या सर्वाना माझ्या शुभेच्छा !

– राजेश टोपे (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

दररोज तेराशेवर कोरोना संशयितांना सेवा

कोरोनाकाळात दररोज सरासरी १३४९ कोरोना संशयित किंवा बाधित रुग्णांना महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय मदत सेवेची सेवा लाभली. भारतात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून या सेवेतील रुग्णवाहिकांपैकी तब्बल ४८५ रुग्णवाहिका कोरोना संशयित किंवा बाधितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पुणे जिल्ह्यात कोरोंनासाठी ३८ रुग्णवाहिका राखीव आहेत.

या सेवेत कार्यरत असलेल्या वैद्यकीय पथक तसेच रुग्णवाहिका चालक आणि अन्य कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण कोरोनाबाधित झाले. मात्र तरीही कोरोनासह इतर आपत्कालिन प्रसंगांसाठी ही सेवा अखंडपणे कार्यरत सुरु राहिली. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मिळून ३१ जुलै २०२० पर्यंत तब्बल २ लाख ४४ हजार १९३ कोरोना बाधित-संशयितांना ही सेवा पुरविण्यात आली. मुंबई, पुणे, चंद्रपूर, कोल्हापूर, सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना संशयित-बाधित रुग्णांना सेवा पुरविण्यात आली. त्यामध्ये गंभीर रुग्णांना प्राथमिक उपचारासह सर्व रुग्णांना सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचविण्याचा समावेश होता, अशी माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.