लडाखच्या 21 गावांमध्ये हायअलर्ट आणि ब्लॅकआऊट, ‘या’ लोकांनी केला ‘ड्रॅगन’च्या चालबाजीचा ‘पर्दाफाश’

जम्मू : वृत्तसंस्था – वीस भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर आणि चीनसोबत वाढत असलेल्या तणावाच्या दरम्यान पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) 21 गावांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. बहुतांश गावांमध्ये मागच्या एक महिन्यापासून इमर्जन्सीसारखी स्थिती आहे, परंतु श्योक आणि गलवा नदीच्या संगमाजवळील सोमवारी रात्रीच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हार्यअलर्ट घोषित केला आहे. सीमावर्ती परिसरात दिवस-रात्र गस्त वाढवण्यात आली आहे. ही गावे चुशुल, पँगोंग तलावापासून गलवां, श्योकपासून दौलत बेग ओल्डीपर्यंत आहेत. लडाख स्वायत्त पहाडी विकास परिषदेच्या चुशुल मतदार संघात आठ गावे आहेत, तर तंगसे क्षेत्रात 13 छोट्या गावांमध्ये सुमारे चार हजार लोकसंख्या एलएसीच्या अगदी जवळ वसलेली आहे.

तंगसेचे नगरसेवक ताशी नामग्याल यांच्यानुसार त्यांच्या मतदार संघात अडीच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या एलएसीच्या अगदी जवळ आहे. एलएसीच्या स्थितीचा थेट परिणाम या लोकांवर होतो. या परिसरात पूर्णपणे ब्लॅकआऊट आहे. तिथे, लेहचे अन्य लोकप्रतिनिधी सुद्धा एलएसी जवळील गावांबाबत चिंताग्रस्त आहेत. तेथे कुणाशीही संपर्क होत नाही. एका प्रतिनिधीने सांगितले की, प्रमुख परिसरांतील स्थिती नाजूक असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत, परंतु ते कोणत्याही परिस्थितीत लष्कर आणि देशाच्या सोबत उभे आहेत.

एलएसीवर जमीन बळकावण्याची चीनची कपटी चाल सर्वप्रथम येथील ग्रामस्थांनीच ओळखली होती. थंडीच्या दिवसात महत्वाच्या परिसरात जास्त वर्दळ नसते. या 21 गावातील लोक आपल्या बकर्‍या आणि याक यांना चरण्यासाठी घेऊन जातात. याचवेळी त्यांना चीनच्या हरकतींबाबत त्यांना समजले. याच वर्षात संवेदनशील परिसरात ग्रामस्थांना जाण्या-येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. चीनने आपल्या जमीनीवर कब्जा केल्याचे येथील स्थानिक लोकांनी आपल्या स्थानिक पंचायत प्रतिनिधींना सांगितले होते. यावर आवाजदेखील उठवला होता.