Coronavirus in India : धडकी भरवणारी आकडेवारी ! देशात गेल्या 24 तासात 1.5 लाखांहून अधिक ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण, 839 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाचे ढग पुन्हा एकदा गडद होताना पहायला मिळत आहे. कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढिचा वेग प्रचंड असून राज्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत असल्याचे चित्र आहे. देशात गेल्या 24 तासात आजपर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 52 हजार 879 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. काल (शनिवार) पर्यंत आठशेपर्यंत मर्यादित असलेली मृतांची संख्या आज (रविवार) आठशेच्या वर गेली आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तसात देशात मृत्यू झालेल्या रुग्णाची आकडेवारी ही धक्कादायक आहे. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 52 हजार 879 कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 35 लाख 58 हजार 805 एवढी झाली आहे. तर देशात 90 हजार 584 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत देशात 1 कोटी 20 लाख 81 हजार 087 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात देशात 839 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 1 लाख 69 हजार 275 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत देशात 10 कोटी 15 लाख 95 हजार 147 जणांना लसीचा डोस देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात रुग्णवाढीचा वेग कायम

राज्यात शनिवारी दिवसभरात 55 हजार 411 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर 309 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या महाराष्ट्रात मृत्यू दर 1.72 टक्के इतका आहे. तर 53 हजार 005 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात 27 लाख 48 हजार 153 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ते घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.18 इतके झाले आहे.