Day-Night टेस्टसाठी ऋषभ पंत आणि साहा यांच्यात ‘टक्कर’, जाणून घ्या कोणाला मिळेल संघात ‘स्थान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान अ‍ॅडिलेडमध्ये गुरुवारपासून सुरू होणार्‍या पहिल्या डे नाईट टेस्ट क्रिकेट सामन्यात ऋद्धिमान साहाच्या यष्टीरक्षण मधील चांगल्या कामगिरीला ऋषभ पंतच्या आक्रमक फलंदाजीवर प्राथमिकता मिळू शकते. पहिल्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन हा चर्चेचा विषय ठरला आहे आणि अजून हे ठरलेले नाही की 36 वर्षीय साहाच्या रूपात एक उत्तम विकेटकीपर अथवा 23 वर्षीय पंतच्या रूपात एक उत्तम फलंदाज यापैकी कुणाला संघात स्थान मिळेल.

भारतीय संघ व्यवस्थापनाने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत आणि हनुमा विहारी यांना जेव्हा याबाबत विचारले गेले होते तेव्हा त्यांनीही असे म्हटले होते की ‘स्वस्थ प्रतिस्पर्धा’ संघासाठी चांगली आहे. असा विश्वास आहे की साहाचे चांगले यष्टीरक्षण आणि बचावात्मक फलंदाजीला प्राधान्य दिले जाऊ शकते. प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली, सहाय्यक प्रशिक्षक विक्रम राठोड, भरत अरुण आणि निवडकर्ता हरविंदर सिंह सामन्याच्या परिस्थितीच्या आधारे या दोघांच्या कामगिरीचे मूल्यांकन करतील.

साहाने पहिल्या सराव सामन्यात 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळत भारताला ऑस्ट्रेलिया-ए च्या विरुद्ध पराभवापासून वाचवले होते. तेव्हा त्यांनी जेम्स पॅटिन्सन, मायकल नेसर आणि कॅमेरून ग्रीन सारख्या गोलंदाजांचा सामना केला होता. याउलट पंतने दुसर्‍या सराव सामन्यात शतक झळकावले तेव्हा भारतीय संघ अधिक चांगल्या स्थितीत होता आणि त्यांना लेगस्पिनर मिशेल स्वीपसन आणि कार्यक्षम गोलंदाज निक मॅडिन्सनचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डरने ऑस्ट्रेलिया-ए च्या गोलंदाजीच्या कामगिरीला लाजिरवाणे असल्याचे वर्णन केले होते.

साहाने 37 कसोटी सामन्यांमध्ये 1238 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 3 शतकांचा समावेश आहे. त्यांनी 92 कॅच आणि 11 स्टंप आउट केले आहेत. जरी पहिल्या कसोटी सामन्यात त्यांनी स्थान मिळवले तरी पंतची शक्यता समाप्त होत नाही. साहाला फक्त विकेटच्या मागेच नव्हे तर संघात टिकण्यासाठी विकेटसमोर देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे.