ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर महेंद्रसिंग धोनी होत आहे ट्रोल 

विशाखपट्नम : वृत्तसंस्था – भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता या पराभवासाठी चाहते महेंद्रसिंग धोनीला दोषी ठरवू लागले आहेत. धोनीने या सामन्यात संथ खेळी खेळली. त्यामुळेच भारताला जास्त धावा करता आल्या नाही, असे काही चाहते म्हणत आहे. जगातील सर्वोत्तम फिनिशरचे या सामन्यात ताळमेळ जमत नव्हते. धोनी या सामन्यात ‘गरबा’ खेळत होता, अशा प्रतिक्रिया काही चाहत्यांनी दिल्या आहे. तसेच यासामन्यात महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. टी २० सामन्यात दुसऱ्या क्रमांकाची संथ खेळी करणारा तो भारतीय खेळाडू ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाने रविवारी झालेल्या या पहिल्या टी २० सामन्यात भारताला ३ गडी राखून पराभूत केले. २ षटकात १६ धावांची गरज असताना बुमराहने केवळ २ धावा देत २ बळी घेतले .पण शेवटच्या षटकात १४ धावांची गरज असताना उमेश यादवने अत्यंत असमाधानकारक गोलंदाजी केली आणि शेवटच्या चेंडूवर २ धावा काढून ऑस्ट्रेलियाने सामना खिशात घातला.

धोनी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा भारताची १० षटकांत ३ बाद ८० अशी स्थिती होती. उर्वरीत १० षटकांमध्ये भारताने ८० धावा जरी केल्या असत्या तरी भारताला १८० धावा करता आल्या असत्या. पण अखेरच्या १० षटकात भारताला फक्त ४६ धावा करता आल्या. यामुळेच भारतचा पराभव झाला आणि यामुळेच क्रिकेट चाहते धोनीला त्यासाठीच ट्रोल करताना दिसत आहेत.

महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात ३७ चेंडूंमध्ये प्रत्येकी एक चौकार आणि षटकारासह फक्त २९ धावा केल्या. या सामन्यात लोकेश राहुलने अर्धशतक झळकावले आणि ते देखील ३६ चेंडूंमध्ये. धोनी राहुलपेक्षा एक चेंडू जास्त खेळला, पण तरीही त्याला शंभरच्या स्ट्राइक रेटने धावा करण्यात अपयश आले.