पुजाराचं द्विशतक हुकलं मात्र ९० वर्षांचा विक्रम मोडीत काढला

सिडनी : वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवारी सुरुवात झाली. कसोटी सामन्यात भारताच्या चेतेश्वर पुजाराचं द्विशतक अवघ्या ७ धावांनी हुकलं. मात्र दुहेरी शतक हुकले असले तरी पुजाराने तब्बल ९० वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यात पुजाराने १२५८ चेंडू खेळले आहेत. चेतेश्वर पुजाराने इंग्लंडच्या हर्बट सटक्लिफ यांचा विक्रम मोडला आहे. सटक्लिफ यांनी अ‍ॅशेस मालिकेतील चार कसोटीत सामन्यातील ७ डावांमध्ये १२३७ चेंडूंचा सामना केला होता. ही मालिका १९२८ मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. त्यांनी या मालिकेत एक शतक आणि दोन अर्ध शकत झळकावत ३५५ धावा केल्या होत्या. यामुळे इंग्लंडने ही मालिका ४-१ ने जिंकली होती.
दोन दिवस मैदानावर ठाण मांडून बसणारा पुजारा १९३ धावसंख्येवर लॉयनच्या गोलंदाजांवर झेलबाद होऊन माघारी परतला. द्विशतकी खेळी करण्यात पुजाराला अपयश आलं असलं तरीही त्याच्या नावावर खालील विक्रमांची नोंद झालेली आहे.
१) ऑस्ट्रेलियात ४ किंवा त्यापेक्षा कमी कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधीच चेंडू खेळण्याचा विक्रम चेतेश्वर पुजाराच्या नावावर जमा झाला आहे. त्याने आतापर्यंत तब्बल १२४५ चेंडू खेळले आहेत.
२) परदेशी खेळपट्टीवर सर्वाधिक चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पुजारा तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
३ ) ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पुजाराला सहावं स्थान
४ ) कसोटी सामन्यात १९०-२०० मध्ये बाद होणारा पुजारा आठवा फलंदाज ठरला आहे.
५) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन डावांमध्ये ५०० पेक्षा जास्त मिनीटं फलंदाजी करणारा पुजारा चौथा फलंदाज ठरला आहे.

चेतेश्वर पुजारा याच्या नाबाद शतकी खेळीमुळे आणि नवोदित मयंक अग्रवालच्या ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३०३ अशी भक्कम धावसंख्या उभारली. यात सर्वात मोठे योगदान आहे ते चेतश्वर पुजाराचे. चेतेश्वर पुजाराने आपला फॉर्म कायम राखत ऑस्ट्रेलियामध्ये एकाच कसोटी मालिकेत तिसरे शतक झळकावले. भारताने ४ कसोटी सामन्यांच्या या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. पुजाराच्या या दमदार खेळीमुळे भारतीय संघाला चौथ्या कसोटीसह मालिका विजयाचा इतिहास रचण्याची संधी आहे.