भारतीय वंशाच्या तरुणीचा ऑस्ट्रेलियात निर्घृण खून ; सुटकेसमध्ये आढळला मृतदेह 

कॅनबेरा : वृत्तसंस्था – भारतीय वंशाच्या तरुणीचा ऑस्ट्रेलियात निर्घृण खून करण्यात आलाआहे. प्रीती रेड्डी (३२) असे या तरुणीचे नाव असून डेंटिस्ट म्हणून ती काम करीत होती. प्रीतीचा मृतदेह सिडनी शहरात तिच्याच कारमधील एका सुटकेसमध्ये आढळला. विशेष म्हणजे तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा देखील कार अपघातात मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रीती गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिला रविवारी मॅकडॉनल्ड्सबाहेर वाट पाहताना शेवटचं पाहिलं गेलं होतं. तिच्या घरच्यांशी देखील तीचं अखेरचं बोलणं रविवारीच झालं होतं. मात्र ती बरेच दिवस परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला.

प्रीतीच्या बॉयफ्रेंडचा अपघातात मृत्यू 

पोलिसांनी तपास केला तेव्हा पोलिसांना तिची कार मंगळवारी किंग्जफोर्ड भागात पार्क केलेली आढळली. कारमधील एका सूटकेसमध्ये तिचा मृतदेह आढळला. प्रितीच्या मृतदेहावर अनेक वेळा भोसकल्याच्या खूणा आढळल्या आहेत. दरम्यान, सिडनीतील एका हॉटेलमध्ये ती आणि तिचा एक्स-बॉयफ्रेण्ड राहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तिचा एक्स-बॉयफ्रेण्डही डेंटिस्ट होता. सोमवारी रात्री दहा वाजता त्याचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला.