Coronavirus Impact : रेल्वेचा मोठा निर्णय ! आता तिकिटांवर कोणतीही सवलत मिळणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री आठ वाजता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राला संबोधित करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सर्व रेल्वे तिकिटांवरील सवलत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र, चतुर्थ श्रेणीतील विद्यार्थी, विकलांग आणि 11 प्रकारच्या रुग्णांना यामधून सूट देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून पुढील सुचना मिळेपर्यंत तिकिटांवर मिळणाऱ्या सर्व सवलती बंद करण्यात आल्या आहेत.

देशात कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून आतापर्यंत 179 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लोकांनी कमीतकमी प्रवास करावा यासाठी उपाय योजना आखली आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका कमी होऊ शकेल. रेल्वेने देशातील 250 रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 10 रुपयांवरून 50 रुपये केली आहे.

तिकिटांवर अनुदान मिळणार
रेल्वेने तिकिटांवर अनुदान कायम राहील असे सांगत रेल्वेने सर्व झोनच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात नोटीस बजावली आहे. या निर्णयामध्ये केवळ सवलत रद्द करण्यात आली आहे. सध्या 53 श्रेणींमध्ये सूट देण्यात येते. त्यापैकी केवळ 15 श्रेणींना सूट देण्यात येणार आहे. याशिवाय उर्वरित 38 श्रेणींची सूट काही दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या आरोग्या विभागाच्या सल्ल्यानुसार प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करून नये. रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय हा 20 मार्च आणि त्यापुढील तारखांच्या तिकिटावर लागू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.