खुशखबर ! रेल्वेने प्रवाशांसाठी आणली ‘ही’ खास सुविधा, फक्त 50 रुपयांमध्ये प्रवाशांना मिळणार लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी सातत्याने नवनवीन सुविधा आणत असते. आता रेल्वेने आपल्या कोट्यावधी प्रवाशांसाठी नवीन सेवा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे आता प्रवासी रेल्वे स्टेशनवरच त्यांचे आरोग्य तपासू शकतील. यासाठी रेल्वेने लखनऊ जंक्शन येथे हेल्थ एटीएम कियोस्क बसविला आहे. लखनऊ रेल्वे स्थानकात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी हेल्थ एटीएम कियोस्कचे उद्घाटन केले. हेल्थ एटीएम कियोस्कच्या माध्यमातून प्रवासी केवळ ५० रुपये देऊन आरोग्याशी संबंधित १६ तपासण्या करू शकणार आहेत.

रेल्वे मंत्रालयाच्या ट्वीटनुसार, ५० रुपयांमध्ये प्रवासी बोन मास, शरीरातील चरबी, हायड्रेशन, नाडी दर, उंची, स्नायूंचे वजन (मसल मास), शरीराचे तापमान, ऑक्सिजन सॅच्युरेशन, बेसल मेटाबोलिक रेटिंग, स्नायूंची गुणवत्ता (मसल क्वालिटी स्कोअर), चयापचय वय (मेटाबोलिक एज), सिस्टोलिक बीपी, वजन आणि बॉडी मास इंडेक्स इतर पॅरामीटर्स तपासले जाऊ शकतात.

रेल्वेकडून फेस्टिव्हल विशेष ट्रेन :
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने घोषित केलेल्या फेस्टिव्हल विशेष गाड्यांची संख्या वाढविली आहे. आनंद विहार ते भागलपूर, कटिहार, जोगबनी, वाराणसी, मुझफ्फरपूर, दरभंगा या मार्गावर जादा रेल्वे गाड्या धावत आहेत. प्रवाशांना रेल्वेद्वारे चालविल्या जाणार्‍या या फेस्टिव्हल विशेष गाड्यांमध्ये कन्फर्म तिकिटे मिळू शकतात.

दिल्ली-पूर्णिया कोर्ट स्पेशल ट्रेन :
सण-उत्सवांच्या काळात प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेने दिल्ली ते पूर्णियासाठी विशेष ट्रेन चालविली आहे. ट्रेन क्रमांक ०४०८४ दिल्ली-पूर्णिया कोर्ट आठवड्यातून तीन दिवस धावेल. ही गाडी शुक्रवारी, सोमवारी आणि गुरुवारी दिल्लीहून सुटेल. तर रेल्वे क्रमांक ०४०८३ रविवार आणि बुधवारी पूर्णियाहून धावेल. या ट्रेनमध्ये सामान्य डबे असतील. ही विशेष गाडी कानपूर मध्यवर्ती, अलाहाबाद, पं. दीनदयाळ उपाध्याय, बक्सर, आरा, पाटणा, बख्तियारपूर, मोकामा, बेगूसराय, खगेरिया, मानसी, एस बख्तियारपूर सहरसा, दौराम माडपुरा आणि बनमनखी स्थानकांवर थांबेल. अशा काही ट्रेन रेल्वेने सणांच्या मोसमासाठी सुरु केल्या आहेत.

Visit : Policenama.com