भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, 5 सैनिक ठार तर भिंबर परिसरातील 2 चौक्या उद्धवस्त

जम्मू : वृत्तसंस्था –  भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सतत होत असलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यांकडून चोख प्रत्युत्तर दिले असून भिंबर परिसरातील पाकिस्तानच्या दोन चौक्या उध्ववस्त केल्या आहेत. भारतीय सैनिकांनी केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे 5 सैनिक मारले गेले आहेत तर अनेक सैनिक जखमी झाले आहेत. दरम्यान, पाक सैन्य भिंबर पीओकेकडून मेंढार, बालाकोट, तारकुंडी, माजनकोट आणि मानकोट परिसराला टार्गेट करत होती.

राजौरी येथे युद्धबंदीचे उल्लंघन

विशेष म्हणजे गुरुवारी पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर (एलओसी) राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट आणि तारकुंडी भागात मोर्टार आणि लहान शस्त्राद्वारे गोळीबार करण्यात आला. याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

शोपियांमध्ये पाच दहशतवादी ठार

यापूर्वी बुधवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच अतिरेकी ठार झाले. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी सुगु गावात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरु झाली. दहशतवादी असल्याची माहिती विशेष गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने प्रथम सुगु गाव येथे घेराव घातला, असे पोलिसांनी सांगितले.

सुरक्षा दलाने या ठिकाणी आपले लक्ष केंद्रीत करताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. या गोळीबारात हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तैयबाचे पाच दहशतवादी ठार झाले. एका आठवड्या पेक्षा कमी कालावधीत शोपियान जिल्ह्यातील ही तिसरी मोठी चकमक आहे. रविवारी रेबन गावात झालेल्या चकमकीत पाच अतिरेकी ठार झाले होते. तर सोमवारी शोपियांमधील पिंजुरा गावात झालेल्या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले.