पुणे ग्रामीण पोलिसांचा बारामतीत ‘अभिनव’ उपक्रम, म्हणाले – ‘दारू नको…दूध पिऊ या’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – प्रतिवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री दारु पिऊन अनेक लोक गोंधळ घालतात. त्याचा उपद्रव समाजाला होतो, तर काही ठिकाणी भांडणे व मारामाऱ्याचे प्रसंग सुद्धा त्यातुन निर्माण होतात. म्हणून येथील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी यंदा नववर्षाच्या स्वागताला दारु नको दूध पिऊ या… अशा अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे.

याबाबत बोलताना नामदेव शिंदे म्हणाले, दारूचे सेवन केल्यावर किरकोळ भांडणे होतात. नशेत लोकांना आपण काय करतो हे समजत नाही, मग त्यातून गुन्हे दाखल होतात व अनेकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी यंदा पोलीस विभागाने दारु टाळून दुधाचे सेवन करण्याबद्दल पुढाकार घेतला आहे. त्याचसोबत तरुणांसमोर दारुचा आदर्श निर्माण होऊ नये, त्यांनी करिअर करताना प्रेरणादायी विचार मनात यावे, नववर्ष स्वागताच्या नावाखाली घातला जाणारा धिंगाणा टाळून त्याचा समाजाला होणार मनस्ताप कमी करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी पुढाकार घेतल्याचेही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, बारामती पोलिसांनी अशा उपक्रमासाठी पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ. नववर्षाचे स्वागत चांगल्या पद्धतीने व्हावे, कसल्याही प्रकारची कटुता नवीन वर्षाला समोर जाताना मनात निर्माण होऊ नये म्हणून अशा उपक्रमाची गरज होती. त्याच पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला असून शहरातील सर्व दहीहंडी, गणोशोत्सव मंडळांनी या दूध पिण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नामदेव शिंदे यांनी केले आहे.