”कुठलाही चष्मा घाला आणि मंत्र्याला बघा, एकही नेता शेतकरी वाटत नाही : धनंजय मुंढे 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – “मी पाच पिढयांचा शेतकरी असं मुख्यमंत्री म्हणतात. मात्र त्यांना खाली बसता येत नाही. बैलाच्या जागी मंत्र्यांना जुंपलं पाहिजे. कोणीच शेतकऱ्यांच्या बाजूचा नाही. कुठलाही चष्मा घाला आणि मंत्र्याला बघा, एकही नेता शेतकरी वाटत नाही, असा हल्लाबोल विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला. ते नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलत होते.
“भाजपच्या पोटात पोटशूळ उठलं आहे. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण कधीच गेलं नाही. राष्ट्रवादी आणि भुजबळ तुम्हाला पुरून उरल्याशिवाय राहणार नाही. काही करायचं पण राष्ट्रवादीशी नाद करायचा नाही”, असा इशारा धनंजय मुंडेंनी दिला.
काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मी शेतकरी असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर धनंजय मुंडे यांनी गायीची धार काढून दाखवा असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या मी शेतकरी या वक्तव्यावर आक्षेप घेतला. आम्ही सगळे शेतकऱ्याशी नाळ जोडणारे आहोत, असं धनंजय मुंडे म्हणाले.
दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. सत्तेला लाथ मारू म्हणण्याचा विश्वविक्रम उद्धव ठाकरेंनी केला आहे, असा टोमणा त्यांनी लगावला.
सरकार म्हणजे गजनी चित्रपट वाटतोय. इंटरव्हलच्या आधी एक, नंतर एक चाललं आहे. जेव्हा वनवासात जावं लागणार असं लक्षात येतं, तेव्हा भाजपला राम आठवतो. 16 मंत्र्याचे भ्रष्टाचाराचे 90 हजार कोटींचे पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले, मात्र मंत्र्याचे पाप मुख्यमंत्र्यानी झाकलं, असा पुनरुच्चार धनंजय मुंडे यांनी केला.
अच्छे दिनची देशाच्या चौकाचौकात चेष्टा सुरु आहे. स्वतः नितीन गडकरी म्हणाले अच्छे दिन कुछ नही होते,  उसको महसूस करणार पडता है. कोणाच्या खात्यात 15 लाख रुपये आले का? गाजराचा हलवा झाला. साडेचार वर्षांपासून जाहिराती मधल्या अक्काला शोधतोय, अशा घणाघात धनंजय मुंडे यांनी केला.