कोटीपेक्षा जास्त ‘चाहते’ असलेली इन्स्टाग्राम खाती गुन्हे शाखेच्या ‘रडार’वर !

पोलिसनामा ऑनलाईन – इनस्टाग्रामवर एक कोटींहून अधिक चाहते असलेल्या प्रत्येक खात्याची चाचपणी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने सुरू केली आहे. त्यामध्ये चित्रपट-मालिकांशी संबंधीत व्यक्तींसह देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे क्रिडापटू, टीकटॉक स्टारचा समावेश आहे.

कृत्रिमरित्या चाहत्यांची (फॉलोअर) संख्या वाढवून देणार्‍या 54 सोशल मिडीया मार्केटींग कंपन्या आणि जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांकडून गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने घोटाळा उघडकीस आणला आहे. पुढील टप्प्यात पथकाने अशा आणखी 25 कंपन्या शोधून त्यांची चौकशी सुरू केली. आतापर्यंतच्या तपासातून चित्रपट अभिनेते, मेकअप आर्टीस्ट, नृत्यकलाकार, नशीब आजमावण्यासाठी धडपडणार्‍यांसह टीकटॉक अ‍ॅपवरील प्रसिद्ध व्यक्ती, क्रिकेटपटूंची नावे पुढे आली आहेत. लॉकडाउनमुळे दौरे किंवा सामने नसले तरीही भारतीय क्रिकेट संघातील आजीमाजी खेळाडूंचे इन्स्टाग्राम चाहते झपाटयाने वाढल्याचे निरीक्षण आहे. प्रत्येकाच्या इन्स्टाग्रामवरील चाहत्यांची संख्या, संख्येत अचानक झालेली मोठी वाढ, या व्यक्तीने पोस्ट केलेले छायाचित्र, मजकूराचा तांत्रिक तपास सुरू आहे. या तपासातून कोणी, कधी, किती चाहते विकत घेतले, त्याचा वापर कसा केला, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वाझे, प्रफुल्ल वाघ, नितीन लोंढे यांच्या विशेष पथकाने सुरू केला आहे.