भारतीय लढावू विमानांना सज्ज राहण्याचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय वायुसेनेने पाकिस्तानावर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यावर पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा डाव उधळून लावला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज सकाळी पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं भारतीय हवाई हद्दीत शिरली होती. त्यातील एक एफ-16 विमान भारतानं पाडलं आहे. मात्र, यानंतर भारतीय वायुसेनेनं सर्व लढाऊ विमानांना अलर्टवर ठेवलं आहे. सर्व वैमानिकांना २ मिनिटात उड्डाण करण्यासाठी तयार राहण्यास सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, भारत-पाकिस्तान सीमेवर दोन्ही बाजूने हालचालींना वेग आला आहे. भारत आणि पाकिस्तानने आपापल्या देशातील विमानतळांना हायअलर्ट देण्यात आला आहे. तर पाकिस्तानमधील . लाहोर, मुलतान,फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद विमानतळांवर पाकिस्तानने आपले स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे ताबडतोब बंद केली आहेत. तर उत्तर भारतात दक्षतेचे आदेश देण्यात आले असून लेह, जम्मू,श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, चंदिगड, देहराडून, सिमला विमानतळ सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.