पदवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शिवाजी विद्यापीठाची संलग्नित महाविद्यालयांना सूचना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिल्याने आता कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या संलग्न असणाऱ्या विविध अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील कॉलेजमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग (ता. १५) सोमवार पासून नियमित प्रमाणे भरविण्यात यावे,अशा सूचना शिवाजी विद्यापीठाने दिली आहे. तसे परिपत्रक विद्यापीठाकडून अधिविभाग आणि महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, महाविद्यालयांमध्ये वर्ग भरविण्याबाबत शासन आदेशानुसार कार्यवाही करण्यासाठी विद्यापीठाने विद्या परिषद, व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेतली. त्यानंतर वर्ग भरविण्याबाबतच्या विविध सूचना, नियमावली या ई-मेलव्दारे केल्या आहेत. त्यामध्ये वसतिगृहेही सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करावीत. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि विद्यापीठाने नेमलेल्या प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे समितीच्या शिफारशींची माहिती अधिविभाग, महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ऑफलाईन, ऑनलाईन परीक्षा घेणे, वर्गातील उपस्थितीबाबत विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येऊ नये, वसतिगृहे आणि महाविद्यालयांचे इलेक्ट्रिक आणि सेफ्टी ऑडिट करून घेणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्याबाबत प्रशासना बरोबर चर्चा करणे, अशा अनेक सूचनांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.