IPL 2019 : ‘कॅप्टन कूल’चा संयम सुटला ; पंचाशी वाद घालणे पडले महागात

जयपूर : वृत्तसंस्था – महेंद्रसिंह धोनी याला सर्व ‘कॅप्टन कूल’ या नावाने ओळखतात ते त्याच्या शांत स्वभावामुळे. मात्र आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील एका सामन्यात चाहत्यांना त्याचे उग्र रुप पाहायला मिळाले आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा सामना सुरु होता. सामन्याच्या अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची गरज होती. मधल्या चेंडूवर पंचांनी नो-बॉलचा इशारा केला. मात्र यानंतर दुसरे पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी तो चेंडू नो-बॉल नसल्याचं जाहीर केलं. तेव्हा दोन्ही पंचांमध्ये प्रचंड सावळागोंधळ पहायला मिळाला. हा प्रकार पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या धोनीने संयम सोडून थेट मैदानात जाऊन पंचांसोबत वाद घातला.

पंच उल्हास गंधे यांनी नो-बॉलचा इशारा दिला होता. तरीही पंचांनी आपला हा निर्णय मागे घेतला म्हणून धोनीने मैदानात येऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचा हा अवतार त्याच्या चाहत्यांसाठी नवीनच होता. मात्र पंचानी धोनीला शांत करून मैदानाबाहेर पाठवले, असा हा प्रकार घडला. त्यावर आता हा वाद घलणे धोनीच्या अंगलट आले आहे.

मैदानात येऊन पंचांशी वाद घातल्याने आयपीएलने धोनीवर कारवाई केली आहे. या सामन्यासाठी धोनीला मानधनाच्या ५० टक्के रक्कमच देण्यात येणार आहे. मैदानात येऊन नियम मोडल्याप्रकरणी त्याचे ५० टक्के मानधन कापले जाणार आहे. यासंदर्भात आयपीएलने रात्री उशीरा प्रसिद्ध पत्रक जारी करत हा निर्णय सांगितला आहे.

जयपूरमधील राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चेन्नई सुपकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सामन्याच्या मानधानापैकी ५० टक्के रक्कमेचा दंड केला जात आहे. आयपीएलच्या नियमावलीप्रमाणे धोनीने लेव्ह दोनमधील २.२० या नियमांमध्ये बसणारी चूक केली असून त्याने ती मान्य केली आहे, असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. तसंच या पत्रकात मात्र धोनीने नेमके कोणत्या नियमांचे आणि कशाप्रकारे उल्लंघन केले हे स्पष्ट केलेले नाही.