IPL मुळे ‘या’ खेळाडूचे World Cup खेळण्याचे भंगले ‘स्वप्न’ ; मुंबई इंडियन्स करणार मदत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आयपीएलचा १२ वा हंगाम संपत आलेला आहे. शेवटचे दोन सामने बाकी आहेत. या हंगामात विदेशी खेळाडूंची सर्वात जास्त चर्चा झाली. वेस्ट इंडिजचे खेळाडू सर्वच क्षेत्रात उत्तम ठरले. यात वेस्ट इंडिजचा युवा गोलंदाज अलझारी जोसेफ आपल्या पहिल्याच सामन्यात चर्चेचा विषय बनला. हैदराबाद विरोधात आपल्या पदार्पणातच १२ धावा देत ६ विकेट घेण्याचा विक्रम केला होता. अलझारी जोसेफ या हंगामात प्रचंड फॉर्ममध्ये होता. या फॉर्मच्या बळावर त्याने मुंबईला अनेक सामने एकहाती जिंकून दिले. परंतु एका सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला उर्वरित सामन्यांना आणि त्यामुळे विश्वचषकाला देखील मुकावे लागले.

मुंबई इंडियन्सकडून खेळताना जोसेफनं राजस्थान रॉयल्स विरोधात ३ ओव्हरमध्ये तब्बल ५० धावा दिल्या होत्या. त्यावेळी क्षेत्ररक्षण करताना त्याला गंभीर दुखापत झाली होती. मात्र आता मुंबई इंडियन्स त्याच्या मदतीला धावून आली आहे. मुंबईचा संघ त्याच्या फिटनेस आणि वैद्यकीय उपचाराचा खर्च उचलणार आहे. मुंबई के. एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने त्याच्यावर उपचार केले जाणार आहे. दरम्यान या दुखापतीतून सावरायला त्याला आणखी ५ ते ६ महिने लागणार असून यामुळे त्याचे पहिला विश्वकप खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.

You might also like