मुंबईतील IPL सामन्यांना नागरिकांचा जोरदार विरोध; CM ठाकरेंना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात कडक निर्बंध जाहीर करत मीनी लॉकडाऊन लागू केला आहे. अशातच 10 एप्रिलपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर IPL चे सामने होत आहेत. पण सामने होण्यापूर्वीच येथील कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या सामन्यांना विरोध केला आहे. याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईतील IPLचे सामने बाहेर हलविण्याबाबत मागणी केली आहे.

याबाबत वानखेडे स्टेडियमच्या बाजूला डी रोड येथे राहणारे अतित श्रॉफ यांनी नुकतेच मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहेले आहे. त्यात म्हटले आहे की, वानखेडे स्टेडियममध्ये बरेच खेळाडू सरावाला येतात. त्यांना पाहण्यासाठी चाहते मोठी गर्दी करत असतात. त्यामुळे यातून करोना पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच वानखेडेवर सामने खेळवू नयेत, येथील सामने मुंबई बाहेर हलविण्यात यावेत, अशी विनंती केली आहे. आता या पत्रानंतर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान वानखेडेवर 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये पहिला सामना होणार आहे. पण या वातावरणातही IPL मुंबईबाहेर हलवण्याचा विचार बीसीसीआय सध्याच्या घडीला करु शकत नाही. कारण आता कोणत्याही शहरात खेळाडूंना घेऊन जायचे असेल तर त्यांना किमान 7 दिवस क्वारंटाइन करावे लागेल. जर तसे केले तर IPL चे सामने नियोजित वेळेत होणार नाहीत. त्यामुळेच मुंबईतील सामने रद्द न करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.