IPL 2019 : जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार ?

मुंबई : वृत्तसंस्था – भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमरा याला विश्रांती देण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करत असून त्याचा थेट धक्का इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ मुंबई इंडियन्सला बसणार आहे. बुमराह हा मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. मे महिन्याच्या अखेरीस इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांना आयपीएलमध्ये न खेळण्याची सूट देण्यात यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने बीसीसीआयकडे केली होती.

बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या खेळाडूला आयपीएलमध्ये खेळवण्याबाबतचा निर्णय संघ मालकांकडे असतो. काही खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत बीसीसीआय संघमालकांसोबत चर्चा करणार आहे. बुमराहला आयपीएल सामन्यात खेळवायचे असल्यास फक्त निवडक आणि महत्त्वाच्या सामन्यात खेळवण्यात यावे अशी सूचनाही बीसीसीआय संघमालकांना करणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी बुमराहने विश्रांती घेतल्यास संघाच्यादृष्टीने चांगलीच बाब ठरणार असल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. बुमराहप्रमाणे इतर प्रमुख भारतीय गोलंदाजांनादेखील आयपीएलमध्ये विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर वन डे मालिका आणि न्यूझीलंड दौरा असे भारतीय संघाचे वेळापत्रक आहे. आयपीएल संपल्यानंतर त्वरित वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होत आहेत. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. जसप्रीत बुमराहसोबत, विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या या खेळाडूंबद्दलही बीसीसीआय अशाच प्रकारचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.