IPS अधिकारी सदानंद दाते केंद्रातून पुन्हा महाराष्ट्र पोलिस दलात

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : राज्यात उत्सुकता लागून होती की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, आता ही उत्सुकता संपली असून केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची ‘घरवापसी’ झाली असून त्यांची पोलीस आयुक्तपदी वर्णी लागू शकते अशी चिन्ह दिसत आहेत. ते बुधवारपासून राज्य पोलीस दलाच्या सेवेत रुजू झाले आहेत. लवकरच महाविकास आघाडी सरकार त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवणार आहे. मात्र, गृह विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की, मुंबईच्या आयुक्तपदाच्या निवडीवेळी त्यांची नियुक्ती केली जाण्याची तूर्तास तरी शक्यता कमी आहे.

गेल्या पाच वर्षांपासून दाते हे केंद्रीय न्याय विभागात सहसचिव म्हणून कार्यरत होते. त्यांची मुदत संपताच मंगळवारी ते दिल्लीहून परतले आहेत. सध्याला काही दिवसांसाठी त्यांना सक्तीच्या प्रतीक्षेत (कम्पल्सरी वेटिंग) राहावे लागणार आहे. सदानंद दाते हे मूळचे पुण्याचे रहिवासी असून ते १९९०च्या आयपीएस तुकडीतील अधिकारी आहेत. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेत सहआयुक्त म्हणून काम पाहत असताना, त्यांची प्रतिनियुक्ती २५ फेब्रुवारी २०१५ रोजी दिल्लीच्या न्याय विभागात करण्यात आली होती.

सदानंद दाते यांची ओळख एक मितभाषी, प्रामाणिक अधिकारी म्हणून आहे. त्यांनी सीबीआयसह, मुंबई क्राईम ब्रॅँच, फोर्स वनमधील जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी), दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) पुणे आयुक्त यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर होऊ शकते. दरम्यान सेवाज्येष्ठतेनुसार एसआयडीच्या आयुक्त असलेल्या रश्मी शुक्ला यांची पदोन्नती केली केली जाऊ शकते, त्यामुळे त्यांच्या जागी सदानंद दाते यांची नियुक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच माजी आयुक्त राकेश मारिया यांनी केलेल्या आरोपामुळे चर्चेत आलेल्या देवेन भारती यांच्यावर अन्य जबाबदारी देऊन एटीएस प्रमुख किंवा पुण्याचे आयुक्त म्हणून देखील सदानंद दाते यांच्या नावाची वर्णी लागू शकते.