कल्याण-डोंबिवली मनपा निवडणूकीत मनसेला यश मिळणार, एकच पण ‘नेक’च – बाळा नांदगावकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूकीपूर्वीच स्थानिक राजकारणाला वेग आला आहे. मनसेच्या राजेश कदम यांनी शिवसेनेची तर नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपाची वाट धरल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान यावर मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर काही जण पक्ष सोडून गेले. परंतु यात निराश होण्याचे काही कारण नाही. आगामी निवडणूकीत आपल्याला पोषक वातावरण आहे. राजू पाटील हे आपले एकमेव आमदार आहेत, लोक अनेकदा म्हणतात की एकच आहे एकच आहे, पण आमचा एक आहे पण नेक आहे. त्यामुळे पक्षांतराने अजिबात विचलित होऊ नका. पाटील यांच्या नेतृत्वात आपण कल्याण डोंबिवलीत मोठे यश नक्की मिळवू असा विश्वास नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.

मनसेला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मनसे प्रमुख राज ठाकरेंनी बैठक घेतली, त्यानंतर 24 तासांत डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करत राज ठाकरेंनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. कल्याण-डोंबिवली मनसेसाठी पोषक वातावरण असलेला भाग आहे. याठिकाणी मनसेचा एकमेव आमदार राजू पाटील ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले. आमदार पाटील यांच्या नेतृत्वात मनसेने महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याचा चंग बांधला आहे. तत्पूर्वी शिवसेना-भाजपाने मनसेचे 2 मोहरे हिरावून त्यांना चांगलाच धक्का दिला आहे.

त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे, नांदगावकर म्हणाले की, कोणत्याही संघटनेतून कोणीही गेले तरी संघटना ही कायम कार्यरतच असते. आपल्या पक्षाने या आधीही अनेक मोठे पक्षांतर अनुभवले आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की कोणीही गेला तरी आपला महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांवर श्रद्धा ठेवून कायमच कार्यरत असतो असे त्यांनी म्हटले आहे.