सरकारमधील अंतर्गत कुरबुरीमुळे CM ठाकरे नाराज, म्हणाले – ‘सरकार टिकवण ही शिवसेनेचीच जबाबदारी नाही’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीच सरकार सत्तेत आहे. तीन पक्ष एकत्र आल्याने या सरकारमध्ये सुरुवातीपासूनच कमी- अधिक प्रमाणात मतभेद निर्माण होत आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून पदोन्नती आरक्षणावरून सरकारमध्ये वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांची बुधवारी वर्षा निवासस्थानी भेट झाली. या भेटीत पवार यांच्यासमोर मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली. तसेच सरकार टिकवणं ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीची जबाबदारी आहे, असे ठाकरे यांनी पवारांना सांगितले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली खडाजंगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर मंत्र्यांनी घेतलेला आक्षेप, त्याचसोबत मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री आवाज चढवून बोलत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. पवारांच्या बैठकीत या विषयावर गंभीर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान सरकारमधील अंतर्गत कुरबुरीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पदोन्नती आरक्षणावरून काँग्रेसने आम्हीदेखील सरकारमध्ये आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांना लक्ष्य केले होते. जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांवर हल्लाबोल केल्याने बैठकीत उपस्थित मंत्री चकित झाले होते. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना हटवून त्यांच्याऐवजी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची चर्चा होती. दरम्यान, या प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या.