कॅनडात ‘सिंह इज किंग’ ! जगमीत सिंह यांच्या हातात सत्तेची ‘चावी’, 24 जागा जिंकत बनले ‘किंगमकेर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॅनडामध्ये 21 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानाचा निकाल समोर आला असून पुन्हा एकदा विद्यमान पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे पुन्हा एकदा सत्तेत विराजमान होण्याच्या तयारीत आहेत. ते बहुमताच्या आकडेवारीच्या जोरावर सरकार बनवणार असून त्यांच्याकडे पूर्ण बहुमत नसल्याने त्यांचे हे सरकार अल्पमतात असणार आहे. जस्टिन ट्रूडो यांच्या पक्षाला पूर्ण बहुमतासाठी 13 खासदारांची गरज असून शीख नेता जगमीत सिंह हे सध्या किंगमेकरच्या भूमिकेत असून त्यांच्या पक्षाला मिळालेल्या जागांच्या आधारे ते सरकारला पाठिंबा देऊ शकतात.

मंगळवारी आलेल्या आकडेवारीनुसार, जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पार्टीला 157 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी 170 जागांची गरज आहे. तर जगमीत सिंह यांच्या न्यू डेमोक्रेट्स या पक्षाला 24 जागा मिळाल्या असून त्यांनी पाठिंबा दिल्यास सरकार सहज स्थापन होऊ शकते.

मतदानाचा निकाल

एकूण जागा – 338

1) लिबरल पार्टी (जस्टिन ट्रूडो)-157

2) न्यू डेमोक्रेट्स (जगमीत सिंह)- 24

3) कंजरवेटिव्ह पार्टी- 121

4) ब्लॉक क्यूबेकॉइस- 21

5) ग्रीन पार्टी- 3

6) अपक्ष – 1

निकाल समोर आल्यानंतर ग्रीन पार्टी, अपक्ष आणि ब्लॉक क्यूबेकॉइस या पक्षांनी लिबरल पार्टीला समर्थन देणे नाकारले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेची चावी जगमीत सिंह यांच्या न्यू डेमोक्रेट्स या पक्षाकडे असून त्यांनी पाठिंबा दिल्यास स्थिर सरकार स्थापन होण्यास मदत होणार आहे.

कोण आहेत जगमीत सिंह? –

पेशाने वकील असलेले जगमीत सिंह हे पहिल्यांदा किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. 2011 पासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून 2015 मध्ये त्यांना पक्षाचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांना पक्षाचे अध्यक्ष बनवण्यात आले. खलिस्तानी आंदोलकांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांना भारताचा रोष देखील स्वीकारावा लागला होता. 2015 मध्ये त्यांच्या पक्षाला 44 जागा मिळाल्या होत्या.

दरम्यान, कॅनडामध्ये जस्टिन ट्रूडो यांनी सत्ता मिळवल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच जगभरातील अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Visit : Policenama.com