COVID-19 : राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांत 21 नोव्हेंबरपासून पुन्हा लागू होणार कलम 144

जयपूर : वृत्तसंस्था –  राजस्थानात कोरोना संसर्गाची वेगाने वाढणारी प्रकरणे पाहता गेहलोत सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील सर्व जिल्हा मॅजिस्ट्रेटना 21 नोव्हेंबरपासून कलम – 144 लावण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. गृह विभागाच्या ग्रुप-9 ने सर्व जिल्हा मॅजिस्ट्रेटला सूचना दिल्या आहेत. जिल्हा मॅजिस्ट्रेटचे अधिकार 18 नोव्हेंबरला कलम-144 समाप्त होण्यासोबतच समाप्त झाले होते. जिल्हा मॅजिस्ट्रेट मोठ्या कालावधीसाठी राज्य सरकारच्या सल्ल्यानंतरच कलम 144 लागू करू शकतात.

4 लोकांपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास प्रतिबंध

कलम -144 लागू झाल्यानंतर एका ठिकाणी 4 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध लावला जाईल. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कोरोना प्रकरणे वेगाने वाढत असल्याने लोकांना मोठ्या संख्येने एकत्र न येण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने हा निर्णय जनहितासाठी घेतला आहे. गेहलोत यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, याचे पालन करावे. बळाच्या वापराशिवाय जनतेने आपणहून पालन करावे, अशी सरकारची इच्छा आहे.

कलम-144 मध्ये या गोष्टींवर लागू होतात प्रतिबंध

कोणत्याही जिल्ह्यात कलम -144 लागू करण्यासाठी जिल्हा मॅजिस्ट्रेटद्वारे एक नोटिफिकेशन जारी केली जाते. यानंतर या भागात हे कलम प्रभावी होते. ज्या भागात कलम 144 लागू होते तिथे 4 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत. या क्षेत्रात पोलीस आणि सुरक्षा दलांशिवाय कुणालाही हत्यार आणण्यास व बाळगण्यास प्रतिबंध लावला जातो. लोकांना घराच्या बाहेर फिरण्यास प्रतिबंध होतो. कोणतीही वाहतूक कलम 144 असेपर्यंत रोखली जाते.

कोरोना पॉझिटिव्ह केस येण्याचे प्रमाण प्रचंड वाढले

दिवाळीच्या दरम्यान बाजारात मोठी गदी उसळली होती. यानंतर कोरोना पॉझिटिव्ह केस येण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यभरात सरासरी दोन ते अडीच हजार कोरोना पॉझिटिव्ह संक्रमित समोर येत आहेत. हे पाहता राज्य सरकारने जिल्हा कलेक्टर्सला ही सूचना जारी केली आहे.