दानवे – महाजनांसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा मोठा ‘राडा’, ‘शाई’ फेकत केली घोषणाबाजी (व्हिडिओ)

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगावच्या भाजप जिल्हाध्यक्ष निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी मोठा राडा केल्याचे पहायला मिळाले. रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा सरचिटणीस सुनिल नेवे यांना मारहाण देखील करण्यात आली. तर सुनील नवे यांच्यावर शाई फेकण्यात आली. यावेळी दोन्ही गटांनी घोषणाबाजी करत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून शाईफेक केली. यामुळे या ठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले.

केंद्रीय राज्य मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आज जळगाव जिल्हा भाजप अध्यक्षांची निवड होती. निवड प्रक्रियेला सुरुवात होतच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यात दोन गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले त्यांच्यात हाणामारी झाली. भुसावळ शहराध्यक्ष निवडीवरून हा वाद झाला. भुसावळ येथील भाजप कार्यकर्त्यांनी दानवे यांना निवेदन दिले. त्यावेळी हा गोंधळ झाला.
यामध्ये भाजपचे सरचिटणीस सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आली. तसेच नेवे यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्यांचा राडा सुरु झाल्यानंतर दानवे आणि महाजन यांनी संतप्त कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्याने त्यांनी दोघांचेही ऐकले नाही. या दरम्यान, दानवे आणि त्यांचे कार्यकर्ते निघून गेल्याची माहिती मिळत आहे. तर गिरीश महाजन व्यासपीठावर सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते अशी माहिती मिळत आहे.

काय आहे वाद ?
भुसावळ भाजप शहराध्यक्षपदाची निवड बेकायदेशीरपणे झाल्याने भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज आहेत. निष्ठावंतांना डवलण्यात आल्याचा आरोप होत आहे. भुसावळ शहराध्यक्ष निवडीसाठी 11 जण इच्छुक होते. त्यापैकी कोणाचीही निवड न झाल्याने संताप झाला आहे. यावरूनच आज जिल्हाध्यक्ष निवडीत हा वाद झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/