राज्यात पुन्हा पोलिसांवर हल्ला, उपनिरीक्षकासह चौघे गंभीर जखमी

जालना :  पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, याच पोलिसांवर वारंवार हल्ले होताना दिसत आहेत. जालन्यात असाच प्रकार समोर आला असून यामध्ये पोलीस उपनिरीक्षकासह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांवरील होणाऱ्या हल्ल्यामुळे महाराष्ट्राची मान झुकली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापने बंद आहेत. कोरोनाच्या संकटकाळात अवैधरित्या पकडलेल्या दारू साठ्याचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 कर्मचारी आणि पंचावर अवैध दारू विक्रेत्यांनी हल्ला केला. ही घटना भोकरदन तालुक्यातील हिसोडा-बुद्रुक जळकी बाजार शिवारात घडली आहे. या हल्ल्यात पारध पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार पोलीस आणि पंच गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर रेणुकाई पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच भोकरदन विभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा तपास सुरु केला आहे.

दरम्यान, पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनेत वाढ होत आहे. अशा घटनामुळे पोलिसांचे मनोबल खच्ची होण्याची भीती आहे. त्यामुळे असे हल्ले रोखण्यासाठी या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे याबाबत सरकारी पातळीवर काही हालचाली होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.