Coronavirus Impact : स्थगित होणार टोकियो ऑलिम्पिक ! जापानच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदाच केलं वक्तव्य

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा आतापर्यंत सर्वात जास्त परिणाम चीन, इटली, स्पेन आणि इराणवर झाला आहे, तेथे बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु या साथीने जपानला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसू शकतो. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सोमवारी सांगितले की, शक्यतो टोकियो ऑलिम्पिक रद्द करावे लागेल. ते म्हणाले की या महामारीमुळे स्पर्धेचे आयोजन पूर्ण स्वरुपात होऊ शकले नाही तर कदाचित टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची गरज पडू शकते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) रविवारी एका तातडीच्या बैठकीनंतर सांगितले की, २४ जुलैपासून सुरु होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकच्या संदर्भात परिदृश्य योजना पुढे ढकलण्यात येत आहे. या योजनांमध्ये संभाव्य स्थगिती देखील समाविष्ट आहे.

परिस्थिती बिघडल्यास खेळ पुढे ढकलण्यात येतील

जपानच्या पंतप्रधानांनी संसदेला सांगितले की जर परिस्थिती कठीण झाली तर आमच्याकडे खेळ पुढे ढकलण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. जपानच्या पंतप्रधानांनी सांगितले की त्यांनी रविवारी आपले मत टोकियो ऑलिम्पिकचे प्रमुख योशिरो मुरी यांना सांगितले आहे, त्यांनी आयसीसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्याशी या विषयावर चर्चा केली. मीडिया रिपोर्टनुसार टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी ऑलिम्पिकच्या पर्यायी तारखांवर आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे.

ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची होत आहे मागणी

कोरोना विषाणूचा उद्रेक लक्षात घेता सर्व देशांनी आपल्या नागरिकांना घरामध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर आता क्रीडा स्पर्धाही बंद करण्यात आल्या आहेत. आयपीएल, इंग्लिश प्रीमियर लीग, फ्रेंच ओपन यासारख्या जगाच्या मोठ्या स्पर्धादेखील पुढे ढकलल्या गेल्या आहेत. काही काळापासून बहुतेक देश, खेळाडू आणि संघटना ऑलिम्पिकच्या स्थगितीची मागणी करत आहेत आणि आता कॅनडानेही आपला संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

या साथीच्या रोगाने जगभरात आतापर्यंत १३ हजाराहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. त्याचवेळी जवळपास ३ लाख लोकांना संसर्ग झाला आहे. युरोपमध्ये या साथीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. रविवारी पहाटेपर्यंत जपानमध्ये या विषाणूमुळे ३७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.