जसप्रीत बुमराह घेणार ‘सात फेरे ! त्यामुळे क्रिकेटमधून घेतला ‘ब्रेक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नुकताच इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून आपले नाव मागे घेतले. बुमराहने वैयक्तिक कारणे सांगून हा निर्णय घेतला. कसोटी मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड दरम्यान 12 मार्चपासून होणाऱ्या पाच टी -20 सामन्यांतही बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. यानंतर 23 मार्चपासून दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भिडतील. यानंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतूनही बुमराह माघार घेऊ शकतो. या विश्रांतीमागे बुमराह आणि बीसीसीआयने केवळ वैयक्तिक कारण असल्याचे म्हंटले आहे, मात्र याचे खरे कारण म्हणजे हा वेगवान गोलंदाज लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

बुमराहशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, या खेळाडूचे लग्न एका आठवड्यात होणार आहे. त्याचे लग्न एका स्पोर्ट्स अँकरशी गोव्यात होणार असल्याचे समजते. दरम्यान तारीख अद्याप गुप्त ठेवली आहे. बुमराह मूळचा अहमदाबादचा आहे, पण आता त्याचे कुटुंब मुंबईत राहते. कोरोनामुळे अधिक लोकांना लग्नासाठी आमंत्रित केले जाणार नाही आणि म्हणूनच गोव्यात हे लग्न केले जात असल्याचे म्हंटले जा आहे. दरम्यान सीरिज सुरु असून टीम बायो-बबलमध्ये असल्याने भारतीय संघाच्या खेळाडूंना बुमराहच्या लग्नात सहभागी होणे कठीण आहे.

अहमदाबादमध्ये डे-नाईट टेस्टमध्ये भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला. त्या सामन्यात बुमराहला स्पिन पिचमुळे जास्त गोलंदाजीची संधी मिळाली नाही. चेन्नईमधील दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याला विश्रांती देण्यात आली, यावेळी इशांत शर्मासह मोहम्मद सिराजने वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व केले. तिसर्‍या कसोटीनंतर बीसीसीआयने एक निवेदन जारी करत म्हंटले कि, बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या टी – 20 मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली आहे. जी त्याच्या मूळ गावी अहमदाबाद येथे होणार आहे. त्यात पुण्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत परत येणेही त्याला अवघड आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हंटले की, बुमराहला लग्नासाठी अधिक वेळ हवा होता, म्हणून हे करण्यात आले. लग्नानंतर बुमराहचे क्रिकेट मैदानात पुनरागमन आता थेट आयपीएल 2021 मध्ये होणार आहे. इंग्लंड मालिका संपल्यानंतर एप्रिलमध्ये त्याची सुरुवात होणार आहे. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात बुमराहने चार विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेपूर्वी बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आणि ब्रिस्बेन येथे झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याच्या पोटातील स्नायूंत तणाव आल्याने तो खेळू शकला नाही.