अभिनेत्री जयाप्रदा भाजपकडून लोकसभा लढवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी उमेदवारीची समीकरणे बदलू लागली आहेत. उत्तर प्रदेश लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री जयाप्रदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात भाजपमध्ये हालचालींना वेग आल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे. जयाप्रदा यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यास त्यांचा सामना समाजवादी पक्षाच्या आजम खान यांच्याशी होऊ शकतो.

याआधी हि रामपूर मधून जयाप्रदा या दोन वेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. तर रामपूर मधून समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते आजम खान ९वेळा आमदार म्हणून निवडून गेले आहेत. तसेच त्यांचा कनिष्ठ पुत्र अब्दुल्ला हा देखील याच लोकसभा मतदारसंघातून आमदार आहे. पक्षाने तिकीट दिल्यास आपण निवडणुकीच्या रणात उतरणार आहे असे आजम खान यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

आजम खान आणि जयाप्रदा यांचा वाद फार जुना आहे. जयाप्रदा अगोदर समाजवादी पक्षात कार्यरत होत्या. २००९ साली रामपूर मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली तेव्हा आजम खान यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्या अभिनय क्षेत्रातील असल्याने त्यांना आजम खान यांनी नाचणारीपासून ते घुंगरुवाली पर्यंत संबोधणारे बॅनर मतदारसंघात लावले होते. तरीही त्यावेळी जयाप्रदा या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. या जुन्या वादाचा बदला घेण्याची संधी जयाप्रदा यांना चालून आली आहे असे उत्तर प्रदेशाच्या राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे. त्यामुळे जयाप्रदा यांची उमेदवारी वादळी ठरण्याची शक्यता आहे.