आ.जयकुमार गोरे विखेंच्या भेटीला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या भेटीसाठी काँग्रेसचे माणखटावचे आमदार जयकुमार गोरे हे अचानक संगमनेरमध्ये आले होते. त्यांनी संगमनेर ते आश्वी असा प्रवासही एकाच गाडीतून केला. त्यामुळे गोरे हे नेमकी काय राजकीय भूमिका घेतात, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

दोनच दिवसापूर्वी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी संगमनेरमध्येच भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केले होते. राधाकृष्ण विखे जो निर्णय घेतील, त्यासोबत आम्ही राहू, असे जाहीर वक्तव्य करून अन्य आमदारही प्रवेशासाठी तयार असल्याचे आ. सत्तार यांनी बोलून दाखविले होते. याच पार्श्वभूमीवर विखे आणि आ. गोरे यांची संगमनेरमध्ये झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

मुंबईहून बुधवारी सकाळी विखे यांचे संगमनेर शहरात आगमन झाले. शहरातील व्यापाऱ्यांनी यावेळी विखे पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या स्वागत भेटीत राजकीय गप्पाही रंगल्या. त्यानंतर विखे व गोरे यांनी संगमनेर ते आश्वी दरम्यान एकाच गाडीतून प्रवास केला. विखे हे काही आमदार घेऊन भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आमदार गोरे यांनी त्यांची भेट घेतल्याने तर्कविर्तकांना उधाण आले आहे.