जेजुरी नगरी पर्यटनक्षेत्र होण्यासाठी विकास आराखडा तयार केला जाणार : खा. सुप्रिया सुळे

जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाची जेजुरी नगरी पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी जेजुरीचे ऐतिहासिक वैभव असणाऱ्या होळकर तलाव व पेशवे तलावाची खासदार सुप्रिया सुळे आमदार संजय जगताप यांनी पाहणी करून श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या श्री मार्तंड कोव्हीड सेंटरला भेट दिली . जेजुरी नगरी पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित होण्यासाठी विकास आराखडा तयार केला जाणार असल्याचे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

शनिवार दि १७ रोजी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरी शहराला भेट दिली. श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून नगरसेविका अमिना पानसरे मित्र परिवारच्या वतीने जेजुरी रेल्वे स्टेशनमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राचे कुलदैवत व धार्मिक तीर्थक्षेत्र असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी जेजुरी शहरातील ३६ एकरमध्ये असणारे ऐतिहासिक पेशवे तलाव तसेच १६ एकरात असणाऱ्या ऐतिहासिक होळकर तलावाची पाहणी खासदार सुप्रिया सुळे व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केली. तसेच श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने कडेपठार पायथ्याशी जिजामाता इंग्लिश स्कूल मध्ये सुरु करण्यात आलेल्या श्री मार्तंड कोव्हीड सेंटरला भेट दिली. यावेळी कोव्हीड संसर्गाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणारे उपकार फौंडेशन, कोव्हीड सेंटर मध्ये काम करणारे डॉक्टर्स ,नर्से व देवसंस्थानच्या कर्मचाऱ्यांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणल्या की, गेली सहा महिन्यापासून राज्यातील सरकार व प्रशासन कोव्हीडच्या आव्हानाशी लढत आहे. प्रचंड यंत्रणा राबवून कोव्हीड संसर्ग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मागील महिन्यात पुणे जिल्ह्यात दररोज पाचशे रुग्ण आढळत होते,ते प्रमाण सध्या कमी होवून २५ ते ५० पर्यंत आले आहे. कोव्हीड च्या विरोधात लढणाऱ्या प्रशासनातील सर्व घटकाला मी मानाचा मुजरा करते. कोव्हीडचे संकट आणि अतिवृष्टी यामुळे राज्य शासन अडचणीत आले आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत केली पाहिजे अशी आपली भूमिका आहे. जेजुरी शहराचा विकास आरखडा तयार केला जात आहे.आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून सर्व घटकांची मते लक्षात घेवून ,पुढील पन्नास वर्षांचा विचार करून एक पर्यटनक्षेत्र म्हणून विकास आरखडा तयार करून लवकरच तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

आमदार संजय जगताप यांनी यावेळी सांगितले की, दीड महिन्यांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे व आपण मंत्री महोदय शंकरराव गडाख यांची भेट घेवून जेजुरी शहरातील होळकर तलाव व पेशवे तलावाचे पुनर्जीवन करण्यासाठी, तलावातील गाळ काढणे ,खोली वाढविणे, दुरुस्ती करणे याचा प्रस्ताव मांडला आहे. होळकर तलाव ३६ एकरात असून त्यात १०० दशलक्ष घनफूट पाणी साठा निर्माण होवू शकतो,तसेच होळकर तलावात अहिल्यादेवी सृष्टी निर्माण करून पर्यटनक्षेत्राला चालना दिली जाणार आहे.

यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिलीप बारभाई,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदामआप्पा इंगळे,प्रा.दिगंबर दुर्गाडे, दत्ताआबा चव्हाण,विराज काकडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडेपाटील, नगरध्यक्षा विना सोनवणे, विरोधीपक्ष नेते जयदीप बारभाई, बापू भोर, राजेंद्र भोसले, कॉंग्रेसचे नेते गणेश जगताप ,श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, अँड. अशोक संकपाळ, व्यवस्थापक सतीश घाडगे, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, तहसीलदार रुपाली सरनोबत, मुख्याधिकारी पूनम कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.