‘वन मॅन शो, टू मेन आर्मी’चा खेळ खल्लास, ‘या’ नेत्याचं भाजपवर टीकास्त्र

पाटणा : वृत्तसंस्था – झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भाजपवर नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला असून पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘वन मॅन शो आणि टू मेन आर्मी’ तुमचा खेळ संपला आहे, अशा शब्दात त्यांनी मोदी आणि शहांना हिणवले आहे. ‘खामोश, झारखंड बीजेपी… टाटा, बाय-बाय !’ असेही आपल्या खास शैलीत त्यांनी भाजपला सुनावले आहे.

झारखंडच्या निकालानंतर पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि विद्यमान काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये सिन्हा यांनी म्हटले आहे, ‘खामोश, झारखंड बीजेपी…. टाटा-बायबाय. वन मॅन शो आणि टू मेन आर्मी तुमचा खेळ संपला आहे. आता पुढे दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर अनेक ठिकाणांचा नंबर आहे’. तसेच त्यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांचा पराभव करणारे सरयू राय यांची प्रशंसा केली आहे.

झारखंडमध्ये भाजपचा पराभव झाला असून झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन हे सरकार स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आघाडीचे प्रमुख म्हणून हेमंत सोरेन यांनी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्ता स्थापनचा दावा करणार आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/