‘बिहारचे DGP नक्कीच गृहमंत्री होतील’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्यामुळे तपासावरून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, त्या प्रकरणामुळे बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरुद्ध आरोप करणार्‍या पांडे यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर रिया चक्रवर्तीवर असभ्य भाषेत टीका केली होती. त्यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओचा हवाला देत बिहारचे डीजीपी नक्कीच गृहमंत्री होतील असे म्हणत निशाणा साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला होता. मात्र यावेळी त्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलाताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची तिची लायकी नाही असे म्हटले होते.

त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याचबरोबर नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री म्हणून परत आले, तर हे पोलीस महासंचालक नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील, अशी टीका आव्हाड यांनी पांडे यांच्यावर केली आहे. सुशांत सिंहने आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्या. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच बिहार सरकारने सीबीआय तपासाची शिफारस केली होती. त्यावर केंद्राने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे.