JM Road बॉम्बस्फोट प्रकरण : राष्ट्रवादीच्या ‘त्या’ कार्यकर्त्याची जेलमध्ये रवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २०१२ साली पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याने दहशतवादविरोधी पथक (एटीएस)च्या पथकासमोर आत्मसमर्पण केले. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला. त्यानंतर गुरुवारी एटीएसच्या पोलीस ठाण्यात मुंबई येथे त्त्याने आत्मसमर्पण केले. त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.

अस्माल शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार (वय 45, रा. अहमदनगर)असे त्याचे नाव आहे.

बंटी जगागीरदार याला एटीएसने यापुर्वी दोनवेळा अटक केली होती. त्यानंतर तो जामीनावर बाहेर होता. दरम्यान एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बंटी जहागीरदारला आम्ही ताब्यात घेतले त्यानंतर त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली.

दरम्यान, त्याला जामीन दिल्यानंतर तो एटीएसच्या पोलीस ठाण्यात हजर राहात नव्हता. त्याला या अटीवरच जामीन देण्यात आला होता. तसेच तो जामीनावर असताना त्याच्याविरोधात आणखी काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जहागीरदार याला जेएम रोड येथील बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी असलेल्या इरफान लांडगे (वय ३७) याला हत्यारं पुरविल्याचा आरोप आहे.

इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी जेएम रोडवर १ ऑगस्ट २०१२ रोजी सायंकाळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते.