अखेर कन्हैय्या कुमारवर दाखल झाले आरोपपत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – “भारत तेरे तुकडे हो हजार इन्शा अल्ला इन्शा अल्ला” “अफजल गुरु हम शरमिंदा है तेरे कातिल अभी जिंदा है” अशा घोषणा देऊन चर्चेत आलेल्या कन्हैय्या कुमार याच्यावर आज पटियाला हाऊस न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीच्या विरोधात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. तेव्हा कन्हैय्या कुमारवर दिल्ली पोलीसात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गुन्ह्याचे आज आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

कन्हैय्या कुमारवर तब्बल १२००आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या आरोपपत्रात मुख्य १० आरोपी बनवण्यात आले आहे. कन्हैय्या कुमार याच्या सह अनिर्बान भट्टाचार्य आणि उमर खालिद यांना आरोपी बनवण्यात आले आहे. कन्हैय्या कुमारने या कार्यक्रमात देश विरोधी घोषणा दिल्या होत्या त्याला या कार्यक्रमाबद्दल आधीच कल्पना होती असे या आरोप पत्रात म्हणण्यात आले आहे. तर घोषणाबाजी करतानाचा कन्हैय्या कुमारचा व्हिडीओ हि पोलीसांच्या हाती लागला आहे असे या आरोपपत्रात म्हणले आहे. तर विद्यापीठात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला कसलीही परवानगी घेण्यात आली नव्हती असे हि पोलीसांनी आरोपपत्रात म्हणले आहे.

९ फेब्रुवारी २०१६ ला दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीविरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सामील असणाऱ्यांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा तत्कालिन अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह काही काश्मिरी तरुणांना या घटनेचे आरोपी ठरविण्यात आले होते. या घटनेच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच ११ फेब्रुवारी २०१६ ला या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी तब्बल तीन वर्षांनी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

कन्हैय्या कुमार सह त्याच्या अन्य साथीदारांना पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर संपूर्ण देशात राजकारण ढवळले गेले होते. त्याच प्रमाणे भाजप दमनतंत्राचा वापर करत आहे असा आरोप देखील भाजपवर विरोधकांनी ठेवला होता. आज दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रावरून पुन्हा नव्याने खल रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्यावर आरोपपत्र दाखल करा असे छातीठोकपणे सरकारला खडसावणारा कन्हैय्या कुमार आता यावर काय भूमिका घेतो हे देखील बघण्यासारखे राहणार आहे.