मुंबई हायकोर्ट मुख्य न्यायमूर्तिपदाची न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली शपथ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज (मंगळवार) पद आणि गोपनीयतेची शथप घेतली. राजभवनातील छोटेखानी समारंभात त्यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दीपांकर यांना शपथ दिली.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, यांच्यासह उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अमजद सय्याद, न्यायमूर्ती के.के. तातेड यांच्यासह अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंह आदी यावेळी उपस्थित होत. यावेळी उपस्थितांनी तोंडावर मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत समारंभात सहभाग घेतला.

दीपांकर दत्ता यांचा थोडक्यात परिचय
न्या. दीपांकर दत्ता हे 55 वर्षाचे आहेत. ते मागिल 14 वर्षापासून कोलकत्ता उच्च न्यायालयात कामयस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून न्यायदानाचे काम करत होते. ते कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिवंगत सलीलकुमार दत्ता यांचे चिरंजीव आहेत, तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अमिताव रॉय यांचे मेहुणे आहेत. 1989 मध्ये एलएलबी पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरुवात केली. मुख्यत्वे कोलकाता उच्च न्यायालयात अनेक वर्षे वकिली केली.

तसेच त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारसाठी काही वर्षे सरकारी वकील म्हणून काम केले. कोलकाता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधी कॉलेजमध्ये व्यख्याता म्हणूनही काही वर्षे काम केले. 22 जून 2006 पासून ते कोलकता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून सेवेत होते. आता ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहणार आहेत.