राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलानं केले ट्विट, म्हणाला – ‘वडिलांचा अभिमान आहे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारला जोरदार धक्का भेटला आहे. शिंदे यांच्यासोबत काँग्रेसमधील ६ मंत्र्यांसोबत २० आमदारांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपलं दु:ख पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केल आहे. दरम्यान, या प्रसंगात ज्योतिरादित्य शिंदे यांचं कुटुंब त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे. ‘मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे,’ असं ट्विट करत ज्योतिरादित्य शिंदे यांचा मुलगा महाआर्यमान शिंदे याने आपल्या वडिलांच्या निर्णयाला सपोर्ट केला आहे.

‘मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे, त्यांनी स्वत:साठी भूमिका घेतली आहे. एक वारसा सोडण्यासाठीही हिंमत गरजेची असते. इतिहास सांगतो की, माझं कुटुंब कधीही सत्तेसाठी भूकेलेलं नव्हतं. आम्ही दिलेलं वचन निभावत भारत आणि मध्य प्रदेशात नक्कीच प्रभावी बदल घडवून आणू’ असं ट्विट महाआर्यमान शिंदे यानं केलं आहे.

तसेच, ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. ‘तुम्हाला माहीती आहे की, गेल्या वर्षभरापासून मी यापासून दूर राहत होतो. परंतु आता मी काँग्रेसमध्ये आणखी काळ राहू शकत नाही. गेल्या १८ वर्षांपासूनच्या काँग्रेससोबतीनंतर आता पुढे सरकण्याची वेळ आली आहे. आता मी एक नवी सुरुवात करू इच्छितो, असं पत्रात लिहीत त्यांनी भविष्यातील दिशा स्पष्ट केली. दरम्यान, राजीनाम्यानंतर शिंदे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून बुधवारी ते भोपाळमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून आपला अर्ज भरणार असल्याचं म्हटल जात आहे.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशच्या राजघराण्याचे वारस आहेत. तब्बल २७ खासदार या राजघराण्यातून संसदेत पोहचले आहेत. ज्योतिरादित्य यांची पत्नी प्रियदर्शिनी राजे शिंदे यांचा जन्मही गुजरातच्या बडोद्याच्या गायकवाड राजघराण्यातला आहे. ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शिनी या जोडप्याला महाआर्यमान हा मुलगा आणि अनन्या ही मुलगी अशी दोन अपत्य आहेत.